मुंबई: आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी गोळा करण्यात आलेल्या निधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन काल सत्र न्यायालयानं फेटाळला. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखा सोमय्या पिता-पुत्रांना नोटीस बजावणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखा सोमय्या पिता-पुत्रांना नोटीस बजावेल. उद्या दोघे चौकशीसाठी हजर न राहिल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल. सोमय्या पिता-पुत्रांविरोधात वॉरंट जारी केलं जाईल. दोघांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं तीन पथकं तयार केली आहेत. सोमय्या चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या शोधासाठी तीन पथकं रवाना होतील. त्यामुळे उद्या हजर न झाल्यास सोमय्यांच्या अडचणी वाढू शकतात.

अधिक वाचा  पुण्यात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र;तिघांविरोधात गुन्हा दाखल,मोटार आणि यंत्रणाही जप्त

गृह विभागाला ठावठिकाणा माहीत नाही

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा ठावठिकाणा माहिती नाही. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही.

केंद्राकडे विचारणा करू- वळसे पाटील

केंद्रानं सोमय्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षा दिलेली व्यक्ती कुठे आहे याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाला विचारणा करू, असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. दुसऱ्यांवर आरोप करणं सोपं असतं. मात्र स्वत:वर आरोप झाले की पळून जायचं हे काही शूरपणाचं लक्षण नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.

अधिक वाचा  अंदमानात पावसाचं लवकरच आगमन, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

सोमय्या गुजरात किंवा गोव्यात- राऊत

एकीकडे गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा माहीत नसताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांचं लोकेशन सांगितलं आहे. गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

‘आयएनएस विक्रांत’ बचाव मोहिमेच्या नावाखाली सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असून देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयातही घोटाळे करणाऱ्या सोमय्या यांना दिलेली सुरक्षा केंद्र सरकारने तातडीने काढायला हवी. अशा माणसाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दिली आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचं राऊत म्हणाले.