मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवास स्थानावरील हल्लाप्रकरणी गिरगाव न्यायालयात पोलिसांनी आज (ता. ११ एप्रिल) अनेक गोष्टींचे खुलासे करण्यात आले. त्यात हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात आले. तसेच, एका वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि सदावर्ते यांच्यातील घटनेच्या दिवसाचे सकाळी साडेदहापासूनचे चॅट उघड झाले आहे. तसेच त्यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलही झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या खात्यात दीड कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले.

गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सदावर्ते यांना बुधवारपर्यंत (ता. १३ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांच्या खात्यात दीड कोटीहून अधिक रक्कम कोणाकडून आली आणि ती कशी वापरली गेली याचा तपास करायचा आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला. त्याशिवाय पोलिसांकडूनही अनेक दावे करण्यात आले. त्यात पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला पूर्वनियोजित होता, अशी शक्यता वर्तविण्यात आली. एका वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि सदावर्ते यांच्यातील घटनेच्या दिवसाचे सकाळी साडेदहापासूनचे चॅट उघड झाले आहे. त्यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलही झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पवार यांच्या घराची रेकी अभिषेक पाटील, सविता पवार, कृष्ण कोरे आणि मोहंमद ताजुद्दीन यांनी केली होती. याशिवाय बारामतीत कामगारांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती, असे घरत यांनी न्यायालयात सांगितले.

अधिक वाचा  संभाजीराजेंचा शिवबंधनास नकार! `प्लॅन बी` मध्ये ही ३ नावे!

या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे ‘सावधान शरद’ बॅनरवर सदावर्ते पती-पत्नीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे, याकडेही वकील घरत यांनी लक्ष वेधले. सदावर्ते यांना सध्या एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यात ठेवले आहे.

सदावर्तेंना नागपूरहून दूरध्वनी

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या खात्यात तब्बल एक कोटी ८० लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ती त्यांनी एसटी कामगारांकडून प्रत्येकी ५५० रुपये घेऊन जमा केली, असा दावा केला आहे. हल्ला करण्याआधी इशारा देणारे बॅनरही लावले होते. त्यामुळे संबंधित घटना पूर्णपणे सुनियोजित कट होता, असे वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. अन्य एका व्यक्तीने नागपूरहून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दूरध्वनी केला होता, असे सांगण्यात आले. मात्र, त्याचे नाव घरत यांनी आज उघड केले नाही.