इतिहासात आजवर ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला-मजनू असो वा रोमिओ-ज्युलिएट. अनेकदा समाजामुळे काहींना आपलं प्रेम गमवावं लागतं. अशाच धाटणीच्या चित्रपटातून अभिनेता सोहम चाकणकर सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. रुपाली चाकणकरांचा मुलगा या चित्रपटात विशेष भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती राजू तोडसाम, ऋषभ कोठारी व सागर जैन यांनी जैन फिल्म प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत केली. तर कपिल जोंधळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

अधिक वाचा  ठाकरेंचे दुसरे 'खास' राज्यसभेवर? मातोंडकर अन नार्वेकरांची चर्चा

या चित्रपटाची कथा रोमँटिक असून सोहम या चित्रपटात गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारणार आहे. शिवाय सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहमसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. सोहम चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल बोलताना म्हणाला, ‘अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मला निर्माते सागर जैन यांनी दिली.

दिग्दर्शक कपिल सरांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. शूटिंगला आल्यानंतर मला टीमने खूप साथ दिली. ज्यामुळे मी या क्षेत्रात नवीन आहे याची जाणीव मला झाली नाही. कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरंच काही नव्याने शिकता आलं आणि माझा अभिनयाबाबतीतचा रस वाढत गेला. ‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपटाची कथा रोमँटिक आणि फ्रेश असल्याने काम करायला मज्जा आली. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.

अधिक वाचा  जपानची संशोधनासाठी शुभमला ‘मेक्स्ट’ शिष्यवृत्ती;

‘मुलाच्या पदार्पणाबाबत रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘सर्वप्रथम मी असं सांगेन की सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः त्याचं श्रेय आहे. माझा यात काहीच वाटा नाही. उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले. माझ्यासाठी खरंच अत्यंत आनंदाची बातमी आहे. आमच्या कुटुंबात कोणी अद्याप या क्षेत्रात नाही. सोहम वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोहमच्या मागे कायम आहेतच, आणि नक्कीच आशा आहे की, त्याने निवडलेल्या या क्षेत्रात तो स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करेलं.’