कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून सत्यजित कदम रिंगणात आहेत. तर काँग्रेसने जयश्री जाधव यांना उतरवलं आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे. मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदार मोठा असून ती सर्व मतं जाधव यांच्या पारड्यात पडतील, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘पोलिटिकल केमिस्ट्री’ सांगत हा दावा फेटाळून लावला आहे.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. या मतदारसंघात १२ एप्रिलला मतदान होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कोल्हापूरात सभा घेत आघाडी सरकारवर शरसंधान झाले. तर रविवारी पत्रकार परिषदेत बोलतानाही त्यांनी कोल्हापूर मतदारसंघात सत्यजित नाना कदम यांचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. आघाडीसोबत शिवसेना असली तरी शिवसेनेची सर्व मते भाजपलाच मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

अधिक वाचा  पुण्यातही ज्ञानवापी? शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात

कोल्हापूरातील ‘पोलिटिकल केमिस्ट्री’ बदलली असल्याचे फडणवीसांनी सांगितले. ते म्हणाले, भाजपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: हा मतदारसंघ हिंदूत्ववादी आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजप त्यांच्यासोबत होती. त्यामुळे आमच्या विचाराला मानणारा मतदारसंघ आहे. आता काँग्रेस हा मतदारसंघ लढवत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे.

राजकारणात ‘पोलिटिकल अरिथमेटक’ चालत नाही. तर पोलिटिकल केमिस्ट्री चालते. इथल्या मतदाराची ‘पोलिटिकल केमिस्ट्री’ पूर्णपणे बदलली आहे. मतदार शिवसेनेचा आहे म्हणून काँग्रेसला मतदान करेल, असं अरिथमेटिक लावले जात आहे. पण तो आता लागणार नाही. पोलिटिकल केमिस्ट्री भाजपच्या बाजूने आणि भगव्याच्या बाजूने आहे, हे उत्तर कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अधिक वाचा  संभाजीराजेंची पुरती कोंडी?; राजेंच्या हाती केवळ काही तासचं?

शिवसेनेची सगळी मतं आमची

शिवसेनेची किती मतं भाजपला पडतील, या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेतील सगळेच मतदार आमच्यासोबत आहेत, असा दावा केला. कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात दहशदतीचे वातावरण आहे. ज्याप्रकारे सत्तापक्षाचे नेते, मंत्री दहशत पसरवण्याचे काम करत आहेत, महाराष्ट्र आहे की बंगाल, असा प्रश्न उपस्थित व्हावा, असं काम होताना दिसत आहे. पण या दहशतीला झुगारून लोकं मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भाजपचाच विजय होईल. कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे, एकतरी विकास दाखवू शकतात का? आमच्या सरकारच्या काळात झालेली कित्येक कामे आम्ही दाखवू शकतो. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सरकार स्वत:पलिकडे पाहू शकत नाही, अशी भावना लोकांची झाली आहे, असं फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  लाल महालातील लावणी महागात; वैष्णवी पाटील वर गुन्हा दाखल

महाविकास आघाडी सरकारने एकही काम कोल्हापूरसाठी केलेले नाही. आम्हीच केलेली कामं दाखवत आहेत. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला विजय मिळेल. भाजपचे 107 वे आमदार म्हणून सत्यजित कदम निवडून येतील. पंढरपुरला पांडूरंगाचा आशीर्वाद मिळाला आहे. आता आई अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल. कोल्हापूरमध्ये दहशतीचं वातावरण आहे. बारा तारखेला काय करायचं, हे लोकांचा ठरलं आहे.