आज रामनवमी. रामनवमीचा आज देशभरात उत्साह आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. राज्यात रामनवमीचा उत्साह आहे. शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.

शिर्डीत रामनवमीचा उत्सव; निर्बंध हटवल्याने उत्साह

रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसून येतोय. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. या वर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्याने राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज रामनवमीचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. आज सर्व साईभक्तांना दर्शन घेता याव यासाठी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता निशाण मिरवणूक तर सायंकाळी 5 वाजता रथ मिरवणूक ही काढण्यात येणार आहे.

अधिक वाचा  केतकीचे वय बघता वॉर्निंग देऊन सोडून द्या;पंकजा मुंडेंचे शरद पवारांना आवाहन

रामनवमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभारा बनला काश्मिरी सफरचंदाचा बगीचा 

आज रामनवमीच्या औचित्य साधत पुणे येथील एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातून 5 हजार सफरचंदाची आकर्षक सजावट केल्याने विठुरायाची राउळी चक्क काश्मिरी सफरचंदाचा बगीचा बनली आहे. विठ्ठल मंदिरात विविध सणांना होणारी सजावट ही नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिली आहे. आज रामनवमी असल्याने पुणे येथील भक्त भारत रामचंद्र यादव यांनी सफरचंद आणि फुलांचा वापर करीत ही सजावटीची सेवा दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी हि सजावट करण्यात आली आहे . यासाठी 5 हजार सफरचंद, पांढरी आणि पिवळी शेवंती आणि दवना याचा सजावटीसाठी वापर केला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा सफरचंदाने लगडून गेल्याने देवाच्या मंदिराला काश्मिरी बगीचाचे रुपडे प्राप्त झाले आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिकेचे SC आणि ST चे आरक्षण जाहीर; आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष

शेगावात संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ

शेगावात संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात. कोरोना निर्बंध मुक्तीनंतर शेगावात पहिलाच उत्सव आहे. राम नवमी निमित्त शेगावातील संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळपासून रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजता मुख्य सोहळा होणार आहे. कोरोनाच्या निर्बंधातून मुक्तता झाल्यानंतर हा मंदिरात साजरा होणारा पहिलाच उत्सव असल्याने आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

अधिक वाचा  शरद पवार यांच्या बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही...ब्राह्मण महासंघाचा दावा

विशेष म्हणजे कोरोनाच्या निर्बंधात दर्शनासाठी लागणारी ई पासचा आज शेवटचा दिवस आहे. आजचा राम जन्मोत्सव सोहळा संपल्यानंतर उद्यापासून तीन दिवस मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. 14 तारखेपासून भाविकांसाठी ई पास मुक्त दर्शन मिळणार आहे. राज्यभरातून भाविकांनी आज गर्दी केली असली तरी मात्र आजच्या दिवसभर E Pass धारक फक्त नऊ हजार भाविकांनाच दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

आळंदीच्या मंदिरात श्री रामांची प्रतिकृती

रामनवमी निमित्त पुण्यातील देहू-आळंदीत सजावट करण्यात आली आहे. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात श्री रामांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी माऊलींचा गाभारा ही सजलाय. मंदिराच्या सभामंडपात पाळणा उभारत रामनवमी साजरी केली जातेय. देहूच्या संत तुकाराम महाराज मंदिरात विविध फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करत आहे.