काल पर्यंत मिटलं असं वाटत असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाने आज वेगळंच वळण घेतलं. एसटीच्या विलीनीकरणाची मागणी करणारे कर्मचारी आज शरद पवारांच्या मुंबईच्या बंगल्यावर चालून गेले. जोरदार चप्पलफेक व दगडफ़ेक झाली. अपुरी सुरक्षाव्यवस्था असल्यामुळे आंदोलक सिल्व्हर ओक बंगल्याच्या अगदी दारापर्यंत पोहचले. शरद पवार हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक बोलायच्या मनस्थिती मध्ये नव्हते. काही वेळानंतर पोलिसांनी स्थिती काबूत आणली. हि घटना घडली तेव्हा माजी कृषिमंत्री शरद पवार त्यांची पत्नी व नाती सह बंगल्यात हजर होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मागे काळेबेरे असल्याचा व शरद पवारांच्या प्रकृतीला धोका असल्याचा दावा केला आहे. आज संपूर्ण देशाचं लक्ष सिल्व्हर ओक या बंगल्याकडे लागले आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला वर्षा, ठाकरे परिवाराचे निवासस्थान मातोश्री या बरोबरच राजकीय दृष्ट्या महत्वाचा बंगला म्हणजे पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक.

अधिक वाचा  राज्यातही ओबीसींना आरक्षण; बांठिया समितीचे काम अंतिम टप्प्यात - अजित पवारांची ग्वाही

बारामती जवळ असलेले काटेवाडी हे पवार कुटुंबियांचे मूळ गाव. अगदी कमी वयात राजकारणात उतरून माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून ओळख मिळवणाऱ्या शरद पवारांनी आपल्या कर्तबगारीने अगदी दिल्लीपर्यंत डंका वाजवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषवले. गेल्या काही काळापासून त्यांनी आपले अधिकृत वास्तव्य मुंबईतील सिल्व्हर ओक येथे केले आहे.

सिल्व्हर ओक एका झाडाचं नाव असलं तरी महाराष्ट्रासाठी तो पवार साहेबांचा मुंबईतला बंगला म्हणून फेमस आहे.दक्षिण मुंबईतील नेपियर सी रोड जवळ २२ हजार स्क्वेअर फूट इतकी पसरलेली सिल्व्हर ओक इस्टेट सोसायटी. आज हे पवारांचं घर म्हणून ओळख मिळाली असली तरी ही एकेकाळी पारसी समुदायाची सोसायटी होती.आज हजार करोड इतकी किंमत असलेली हि इस्टेट सोराबजी कांगा ट्रस्टच्या ताब्यात होती. फक्त पारसी कुटूंबियांसाठी असलेल्या या सोसयटीमध्ये साधारण नव्वदच्या दशकात इतर समुदायातील लोकांना ही घर घेण्यास परवानगी मिळाली. त्यानंतरही गेली अनेक वर्षे शांत निवांत उच्चभ्रू लोकांचा एरिया म्हणून ही ओळख बदलली नाही.

अधिक वाचा  पुण्यातील 'रुबी रुग्णालय रॅकेट' प्रकरणात ट्विस्ट, मध्यस्थीनीही एक-एक मूत्रपिंड दिल्याचे उघड

साधारण २०१३ साली तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपलं निवासस्थान सिल्वर ओक इस्टेट मधील बंगला क्रमांक २ इथे हलवले. यापूर्वी ते पेडर रोड येथील रामालय या बंगल्यात राहायचे. मुंबई काँग्रेसचे सम्राट म्हणून ओळख असणाऱ्या मुरली देवरा यांचं देखील वास्तव्य याच भागात होतं. पवारांनी सिल्व्हर ओक येथे आपला पत्ता बदलला आणि मुंबईतील पॉलिटिकल पॉवर हाऊस म्हणून या भागाला ओळख मिळाली. २०१३ पासून त्यांनी आपलं मतदान देखील बारामती मधून मुंबईला बदलून घेतले. त्याकाळात अशी अफवा होती की पवारांना मुंबई क्रिकेट असोशिएशनवर पुन्हा वर्चस्व मिळवायचे आहे म्हणून त्यांनी आपला कायमचा पत्ता मुंबईला हलवला.

शरद पवार यांचे वास्तव्य असलेलं घर म्हणजे साधारण ३००० हजार स्क्वेअर फूट इतका एरिया असणारा साधा बैठा दुमजली बंगला. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती आणि अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या तेव्हा पत्रकारांपासून सर्व देशाचं लक्ष सिल्व्हर ओक कडे लागले होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे झालेल्या शपथविधीनंतर ते सरकार पाडून महाविकास आघाडी ची सत्ता स्थापन करणे यात सिल्व्हर ओक वर झालेल्या बैठकांची महत्वाची भूमिका होती असं मानलं गेलं. आजही विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांच्या सरकारचा रिमोट वर्षावर नाही तर सिल्व्हर ओक बंगल्यात आहे असा आरोप करतात.

अधिक वाचा  या लिखाणाला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही, राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले

म्हणूनच कि काय आज आक्रमक एसटी कर्मचारी आंदोलकांनी आपला मोर्चा सिल्व्हर ओक बंगल्यावर नेला. शांत निवांत पारसी समुदायाचा एरिया असलेला भाग या घटनेनं खळबळून उठला. आता पोलिसांनी अगदी किल्ल्याप्रमाणे कडेकोट बंदोबस्त केला असला तरी इतकी वर्षे शरद पवार यांच्या सारख्या अति महत्वाच्या व्यक्तीचे निवास्थान असलेल्या या सोसायटीच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी या निमित्ताने ठळक पणे समोर आल्या आहेत हे नक्की.