एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर जमले आणि त्यातील काही कर्मचाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना लोटून बंगल्याच्या आवारात घुसले. त्यानंतर सुप्रिया सुळे निवास्थानाबाहेर आल्या. “आंदोलकांना बोलायचं असेल तर माझी ऐकायची तयारी आहे,” असं त्या म्हणाल्या. “मी सर्वांना हात जोडून विनंती करते,” असंही त्या म्हणाल्या.

मी तातडीने चर्चा करायला तयार आहे, माझी सर्वांना शांततेनं बसण्याची विनम्र विनंती आहे, असंही त्या म्हणाल्या. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांचा मोठा फौजफाटा शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाला आहे. पोलिसांनी एक स्कूल व्हॅन आणली असून आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे. आंदोलकांना आझाद मैदानात नेलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एसटी कर्मचारी अचानक शरद पवारांच्या बंगल्याबाहेर पोहोचले. तिथं त्यांनी ‘शरद पवार, हाय हाय’ अशा घोषणा दिल्या. तसंच चप्पल आणि दगडफेक करण्यात आल्याचं माध्यमांनी सांगितलं.

“शरद पवार हे जनतेचे सेवक आहेत. पण, आमच्या 120 आत्महत्या झाल्यात. तरीही हे बघायला तयार नाहीत. हेच का जाणते राजे? कोर्टाच्या निकालाची वाट सरकारला का पाहावी लागली? आमच्या 120 आत्महत्यांना शरद पवार, अजित पवार जबाबदार आहेत,” असं एका आंदोलक कर्मचाऱ्यानं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं. शरद पवारांच्या निवासस्थानी आता पोलीसांची गाडीही दाखल झाली आहे. काही आंदोलक जय श्रीरामचे नारे सुद्धा देत आहेत.

अधिक वाचा  मंदिरात गेले तर का गेले, नाही गेले तर नास्तिक नास्तिक म्हणायचे, बॅन लावा असलं बोलणाऱ्यांवर

महाविकास आघाडी सरकार दगडाच्या काळजाचं – भाजपची टीका

याप्रकरणी भाष्य करताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, “120 मृत्यू होऊनही सरकारनं एसटीच्या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. अनिल परब, अजित पवार यांनी सातत्यानं कठोर भूमिका घेतली. राज्यकर्त्यांनी असं वागू नये. एसटी कर्मचाऱ्यांसमोर काहीच पर्याय उरला नाही. मग ते सरकारचे जे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या घराबाहेर जमले. महाविकास आघाडी सरकार दगडाच्या काळजाचं आहे.”

तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, “अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आजचा हा प्रकार आहे. सरकारनं एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. तरीही कुठल्यातरी एका अज्ञात पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं कृत्य घडावं यासाठी सातत्यानं हालचाली केल्या जात आहेत. महाविकास आघाडीचं सरकार काही लोकांच्या डोळ्यात खुपतं, ते लोक अशाप्रकारचे कृत्य करत आहेत.”

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “महाराष्ट्रातल्या सर्वांत ज्येष्ठ नेत्याच्या राहत्या घरी असं जाणं म्हणजे लोकशाही काय वळण घेतेय? महाराष्ट्रातल्या राजकारणात असं कधीच घडलं नाही. हे थांबवलं पाहिजे.”

अधिक वाचा  अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात खळबळ

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी एसटी आंदोलनात सुरुवातीच्या काळात सहभागी नोंदवला आणि नेतृत्वही केलं.आजच्या घटनेविषयी बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की, आमचं सरकार आलं तर एसटी महामंडळाचं विलीनीकरण करू. पण, राजकारण्यांनी जी शक्य आहेत तिच आश्वासनं दिली पाहिजेत, हा यातून धडा घ्यायला हवा.”

हायकोर्टात गुरुवारी काय घडलं होतं?

कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई नको, अशी सूचना हायकोर्टाने केली. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत रुजू व्हावे. एसटी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी मिळावी. बकरी आणि वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं. प्रत्येक कर्मचाऱ्याला 300 रुपये प्रमाणे एकूण 30 हजार रुपये कोव्हिड भत्ता द्यावा. प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. कर्मचारीही सारासार विवेकबुद्धीला पटणार नाही, असं वागले. पण या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी द्यायला हवी. त्यांच्या उपजीविकेचं साधन त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका, असं कोर्टाने म्हटलं आहे.

अधिक वाचा  'सगळी प्रॉपर्टी विकली तरी...' वडीलांच्या आठवणीत वसंत मोरेंची भावूक पोस्ट

22 एप्रिलनंतर कामावर न येणाऱ्या ST कामगारांना कामाची गरज नाही असं समजू – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे जे कर्मचारी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, असं परब यांनी म्हटलं.

जे कर्मचारी 22 एप्रिलनंतर कामावर परत येणार नाहीत, त्यांना कामाची आवश्यकता नाही, असं समजून कारवाई करु, असंही अनिल परबांनी म्हटलं. कामगारांनी चुकीचा नेता निवडला आणि त्यांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कामगारांची असेल असं म्हणत अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड, गुणरत्न सदावर्तेंना टोला लगावला.

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनाचे सहा महिने

ऑक्टोबर महिना अखेरीस एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत संप सुरू केला. त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून वाढवून 28 टक्के केला. घरभाडं भत्ता वाढवण्याचीही घोषणा करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांविषयी दिवाळीनंतर चर्चा करू असं परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी म्हटलं होतं.पण एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्यात यावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनं आंदोलन सुरू ठेवलंय.