पुणे : पुणे मनसेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज मुंबईत बोलावलं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याच जाहीरपणे सांगणाऱ्या पुणे मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलं नव्हतं. पक्षाची वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी वसंत मोरे यांच्या वरील अतिरिक्त कार्यभार कमी करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत करण्यात आला. अखेर वसंत मोरे यांना पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन पदमुक्त करण्यात आले आहे.

पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची नाराजी समजून घेण्यासाठी आज मुंबईतील ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंनी बैठक बोलावण्यात आली शहरातील निवडक पदाधिकारी आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह बैठक पार पडल्यानंतर वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदाची जबाबदारी बदलण्याचा निश्चय करण्यात आला आहे. जगातील सध्याची पक्षांची परिस्थिती आणि महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा’, असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे.

अधिक वाचा  नवाब मलिक डी गँग प्रकरण : “…त्यामुळे फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत”

सध्या प्रसार माध्यमांमध्ये माजी शहराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांच्या हकालपट्टीबाबत वृत्त प्रसारित करण्यात येत असली तरी ही अर्धवट माहिती असून आजही वसंत मोरे हे पक्षाचे सरचिटणीस असून विविध जबाबदाऱ्या त्यांच्यावरती देण्यात येत आहेत. सध्या ठाण्यातील सभेच्या नियोजनाचे कामांमध्ये वसंत मोरे व्यस्त असल्यामुळे आजच्या बैठकीला येऊ शकले नाही याचा अर्थ त्यांना पक्षातून मुक्त करण्यात आले असे नाही; त्यांच्यावर देण्यात आलेल्या दोन जबाबदारी पैकी एका जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. वसंत मोरे हे पुणे शहरातील मनसेचे नेते असून त्यांची कामाची पद्धत आणि पक्ष संघटनात्मक बांधणी याचा पक्षाला कायमच फायदा होत राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस सांगत आहेत.