पुणे : सासरकडच्यांच्या संसारातील ढवळाढवळीमुळे त्यांच्यात वादावादी होत होते. अशात एके दिवशी पत्नी बेडरूममध्ये चाकू घेऊन झोपली असल्याचे पतीने पाहिले.त्याने घाबरून थेट १०० नंबरला कॉल केला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी पत्नी व तिच्या आई-वडील, भाऊ, बहीण अशा ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या ३२ वर्षांच्या पतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ते पौड रोडवरील वनाज परिसरात सोसायटीत राहत असताना ८ व ९ जुलै २०२० मध्ये हा प्रकार घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी यांचे लग्न झाल्यापासून त्यांच्या संसारात सासरकडील लोकांचा सारखा हस्तक्षेप होत होता. फिर्यादीची पत्नी सायली ही आपल्या सासूला वारंवार तुच्छ वागणूक देत असल्याने त्यांच्या नेहमी वाद होत असत. सायली ही ८ जुलैला बेडरूममध्ये चाकू घेऊन झोपली होती. त्यामुळे घाबरून फिर्यादी यांनी १०० नंबरला फोन केला. तातडीने पोलीस त्यांच्या घरी आले. त्यांनी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तेव्हा सायली हिने फिर्यादी याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

अधिक वाचा  राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजेंचे नवे पोस्टर चर्चेत?

ही बाब सायली हिने तिच्या घरच्यांना सांगितली. ते ऐकून तिचे आई,वडील, भाऊ,बहीण हे तातडीने औरंगाबादहून दुसऱ्या दिवशी पुण्यात आले. फिर्यादी यांच्या वनाज परिवार सोसायटीतील घरात शिरून त्यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या आईला शिवीगाळ करून घरातील दोन लॅपटॉप, ५ तोळे सोने, एक घड्याळ असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरी करून नेला. कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.