नवी दिल्ली- काँग्रेसच्या महाराष्ट्रातील आमदारांची पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली.या बैठकीत काँग्रेसचे जवळपास २० आमदार उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रासाठी काँग्रेसनं दुसऱ्यांदा परंपरा मोडली असं म्हणता येईल कारण तीन वर्षांपूर्वी हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करुन काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला होता. आता काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये प्रभारी किंवा प्रदेशाध्यक्षांशिवाय थेट हायकमांडसोबत आमदारांची बैठक ही दुर्मिळ गोष्ट आहे. राहुल गांधी देखील या आमदारांना भेटणार आहेत.

काँग्रेसच्या नाराज आमदारांकडून सोनिया गांधी यांनी खूप महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. यावेळी सोनिया गांधी देखील बैठकीत संपूर्ण तयारीनिशी आल्या होत्या. नाराज आमदारांचं म्हणणं सोनियांनी नीट लक्ष देऊन ऐकून घेतलंच पण त्यांनी आमदारांकडून पाच प्रश्नांमधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत महत्वाची माहिती जाणून घेतली. सोनियांनी आमदारांना विचारलेल्या पाच पैकी एक प्रश्न लक्षवेधी आणि महत्वाचा ठरणारा आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नाराज आमदारांना राज्याच्या कॅबिनेटमध्ये किमान समान कार्यक्रमाला किती प्राधान्य दिलं जातं? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर काँग्रेसच्या आमदारांचं मत जाणून घेतलं. सोनियांचा हा प्रश्न राज्यातील महाविकास आघाडीचं भवितव्य ठरवणारा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

अधिक वाचा  चंद्रकांत पाटलांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

तुमचं म्हणणं बेधडकपणे मांडा…
सोनिया गांधी यांनी यावेळी काँग्रेस आमदारांना तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडा. मनात काही ठेवू नका, असं दोन-तीनवेळा आमदारांना म्हटलं. त्यानंतर आमदारांनी त्यांचं संपूर्ण मत सोनियांकडे व्यक्त केलं असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे मंत्री आमदारांना विश्वासात घेत नाहीत. विकास कामांबाबत विचारत नाही. पालकमंत्री पक्ष संघटनेला महत्व देत नाहीत. काही मंत्र्यांचा तोरा वाढला असून जनतेशी वागणूकही बदलली आहे. अशा मंत्र्यांना एकतर पदावरून दूर करा किंवा त्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा, अशी मागणी करीत आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असं सोनिया गांधी यांनी आमदारांना आश्वस्त केलं.

अधिक वाचा  शिखर धवनला त्याच्या वडिलांनी बदडले, प्लेऑफमध्ये न पोहोचल्याने नाराज

सोनिया गांधींनी नाराज आमदारांना विचारलेले ५ महत्वाचे प्रश्न पुढीलप्रमाणे..
१. आमदारांची बैठक होते का?
२. प्रत्येक मंत्र्यामागे त्या जिल्ह्याचे किती आमदार आहेत?
३. संघटक आणि मंत्री यांच्यात किती ताळमेळ आहे?
४. राज्याच्या कॅबिनेटमध्ये किमान समान कार्यक्रमाला किती प्राधान्य दिलं जातं?
५. मंत्री कॅबिनेट बैठकीआधी प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांचे प्रश्न समजून घेतात का?

सोनिया गांधी यांनी वरील पाच प्रश्नांमधून काँग्रेसच्या नाराज आमदारांकडून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसंच नाराज आमदारांच्या मागण्यांवर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन आमदारांना देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी देखील या आमदारांना भेटणार आहेत. काँग्रेसला पंजाबमध्ये बसलेला मोठा फटका लक्षात घेता महाराष्ट्रातील पक्ष व्यवस्थापनाकडे हायकमांडनं आता अधिक लक्ष दिल्याचे हे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे.