मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर आजही उलटसुलट चर्चा होत आहेत. भाषणात ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले, टीका केली ते सगळे सध्या आपली प्रतिक्रिया देत राज त्यांच्यावर आरोप करत आहेत. असे असताना आता राज ठाकरे यांनी त्यांच्या पुढच्या जाहीर सभेची घोषणा केली आहे.

राज ठाकरे हे 9 एप्रिल रोजी ठाण्यामध्ये सभा घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी केलेल्या भाषणावर ज्यांनी ज्यांनी चौफेर हल्ले केले त्या सर्वांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात ही सभा घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अधिक वाचा  केतकी चितळेचीही महाराष्ट्रवारी?; १२ वा गुन्हा दाखल: Post वर ठाम असल्याचे न्याालयास सांगितले

गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार या विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली होती. तसेच त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर चांगलेच हल्ले केले होते. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज यांची ठाण्यात 9 एप्रिलला जाहीर सभा होत आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महापालिकांच्या निवडणुका येत आहेत. त्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याच दृष्टीने राज ठाकरे यांचे भाषण असावे अशी चर्चा होत आहे. याआधी देखील पुण्यात मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी त्यांनी मनसैनिकांना संबोधित केले होते.

अधिक वाचा  केंद्राच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण शहरात ११ हजार ६२३ व्यावसायिक अनधिकृत

राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचं मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत व्यक्त केलं होतं. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला होता.

आता राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जी हिंदुत्वाची कास पकडली आहे, ती ठाण्यात होणाऱ्या सभेत देखील दिसणार का? ठाण्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार आणि हनुमान चालिसा तसेच केंद्रीय यंत्रणांच्या वाढत जाणाऱ्या कारवाया यावर ते भाष्य करणार का याची चर्चा सध्या सुरू आहे.