महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले होते. त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली होती. तसेच मशिदींवरील भोंग्यांबाबतही भाष्य केले होते.

राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. भाजपने राज ठाकरेंच्या भाषणाला पाठिंबा दिला आहे, तर काही पक्षांनी त्याला विरोधही केला आहे. आता राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडनेही विरोध केल्याचे समोर आले आहे.

धर्माचे राजकारण बंद करा. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे स्वतः ‘भोंगे’ बंद करायला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का…? दुसऱ्यांचीच घरं किती दिवस जाळणार. किती दिवस आमची पोरं आणि त्यांची डोकी भडकवणार…! घाणेरडे राजकारण थांबवा, आम्हाला दंगली, वाद नको आहे. तुमची मुलं स्टडीत, आमची मुलं कस्टडीत हे चालणार नाही, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  OBC आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन ,आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

विनाकारण मुलांची डोकी भडकवायची, आजपर्यंत अशीच चिथावणीखोर भाषण केली आणि दंगली झाल्या. या दंगलीमध्ये शेकडो मुलांवर गुन्हा दाखल झाले, त्यांना सोडवायला कोणी आले नाही. कालपर्यंत गुण्यागोविंदाने राहणारी लोक आज एकमेकांना मारायला उठली आहे. किती दिवस लोकांना असं भडकवणार आहे, असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

दुकान बंद पडलं म्हणून राज ठाकरे असे भडक मुद्दे काढताय. मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यपाल कोणतीही कारवाई करत नाहीये. हे सरकारचे जावई आहेत का?, असा संतप्त सवालही संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा  कंत्राटी सफाई कामगांरांचे देशव्यापी स्वाभिमान जागृती अभियान सुरु

दरम्यान, मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदींवरील भोंगे खाली उतरवावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय घेतला नाही, तर मशिदींसमोर हनूमान चालिसाचे स्पीकर लावले जातील, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.