महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यात हिंदूत्वाच्या मुद्द्यावर जोर दिला. मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणीही त्यांनी केली. याच मुद्द्याभोवती मनसेचं राजकारण फिरताना दिसत असून, आज मनसेनं थेट शिवसेना भवनाबाहेर एक होर्डिंग्ज लावत उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुका कधी होणार याबाबतच चित्र स्पष्ट नसलं, तरी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं असून, गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी युतीतून बाहेर पडल्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला.

त्याचबरोबर त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणीही केली. मशिदीवरील भोंग्यातून आवाज आला, तर तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असं ते म्हणाले. राज ठाकरेंच्या मागणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालीसा वाजल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा  अभिनेता आर. माधवनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

त्यानंतर आता मनसेनं थेट शिवसेना भवनाबाहेरच होर्डिंग लावलं. “मा. बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हिंदू असून, हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालताहेत. हिंदूंनी लावलेले भोगे काढताहेत… आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राज ठाकरे चालवत आहेत… जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या.”

मशिदीवरील भोंग्याबद्दल राज ठाकरे काय म्हणाले होते?

“माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना… आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता-आवरता नाकीनऊ येतील, इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत.”

अधिक वाचा  कंत्राटी सफाई कामगांरांचे देशव्यापी स्वाभिमान जागृती अभियान सुरु

“अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच. एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही.”

“मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. आमचा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्याप्रकारे स्पीकरचा सकाळ पाच वाजल्यापासून त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. कुठेही लाऊडस्पीकर दिसणार नाही. प्रार्थना घरात करा. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडं मंदिर आहेत. टाका धाडी. काय मिळणार घंटा. आमच्याकडे काहीच नाही.”