मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली निधी गोळा केला होता. ५७ ते ५८ कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, तो निधी राजभवनाकडे जमा केला गेलाच नाही, असं सांगत राऊतांनी सोमैय्यांच्या कंपनीत हा पैसा वापर गेलाय का? असा सवाल केला आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “विक्रांत वाचवा म्हणून ते डबे फिरवायला लागले. त्या काळात त्यांना महाराष्ट्रातील लाखो करोडो लोकांनी पैसे दिले. माझ्या माहितीप्रमाणे किरीट सोमैय्या यांनी ‘सेव्ह विक्रात’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी रुपये होती. मला हे त्यांच्याच एका जवळच्या माणसाने सांगितलं. ५७-५८ कोटी रुपये. महात्मा किरीट सोमैय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. त्यांनी सरकारवर प्रचंड टीका करून, या सरकारमध्ये राष्ट्रीय भावना, देशभक्ती नाही, त्यामुळे आम्ही २०० कोटी रुपये गोळा करून ते राजभवनात जमा करू असं सांगितलं होतं,” असं राऊत यांनी सांगितलं.

अधिक वाचा  खोतांचा पत्ता कट होणार; मेटेंनाही धाकधूक: भाजपकडून नवीन नावे येण्याची चिन्हे

“देशाच्या सरंक्षण व्यवस्थेशी, देशाच्या राष्ट्रीय भावनेशी केलेली शुद्ध फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे. ५७ कोटी रुपये देशद्रोही किरीट सोमैय्यांनी भाजपचा झेंडा घेऊन गोळा केले. ५७ कोटी ही रक्कम लहान नाही. हा आकडा १०० कोटींच्या वर असावा. आता ते येतील आणि सांगतील माझा तर काही संबंध नाही. पैसे गोळे करतानाचे फोटो आहेत,” असं सांगत राऊतांनी आता सोमैय्यांवर कोंडीत पकडलं आहे.

मला दहा लोक कालपासून भेटलेत. त्यांनी सांगितलं की, त्यांनी विक्रांतसाठी पाच-पाच हजार रुपये दिले होते. नेव्हीनगरमधूनही अशाच प्रकारे पैसे गोळा करण्यात आले आणि ही रक्कम कोटींच्या घरात आहे. ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल, तर ही रक्कम कुठे गेलीये? ही रक्कम कुणाच्या घशात आणि खिशात गेलीये? ही रक्कम भाजपने निवडणुकीत वापरली का? किरीट सोमैय्यांच्या कंपनीत वापरण्यात आली का?, हा माझा सवाल आहे,” असा गंभीर आरोप राऊतांनी किरीट सोमैय्यांवर केला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

“राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर गोळा केलेले हे पैसे कुणाच्या घशात गेले, याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी करायलाच हवी. केंद्रीय तपास यंत्रणा जर निष्पक्ष असतील, तर सीबीआय, आयकर विभाग आणि भाजपची पदाधिकारी असलेल्या ईडीने चौकशी करून पाहावी. त्यांना चौकशीत काही सापडत नसेल, तर मी त्यांना मदत करेन,” असंही राऊत म्हणाले.