पुणे – आजच्या आधुनिक युगातही `मुलगी नको, मुलगाच हवा`, असा सूर काही कुटुंबांमध्ये दिसून येतो. यामुळे स्त्री भ्रूणहत्येसारख्या घटना समाजात घडताना दिसतात. याचा परिणाम मुलींच्या जन्मदरावर   झाल्याचं दिसून येतं. मुलगाच हवा, मुलगी नको हा दुराग्रही विचार दूर करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था जनजागृतीपर उपक्रम राबवत असतात. आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. सर्वच क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. परंतु, तरीदेखील अशी विचारसरणी समाजात कायम आहे. दुसरीकडे, मुलीच्या जन्माचं स्वागत करणारे पालकदेखील याच समाजात आहेत. मुलगी जन्माला आली म्हणून मोठा सोहळा, समारंभ आयोजित करणाऱ्या दांपत्यांविषयी आपण अनेकदा वाचतो, ऐकतो. सध्या पुणे जिल्ह्यातलं  असंच एक दांपत्य विशेष चर्चेत आहे. मुलीच्या जन्माचा  आनंद म्हणून या दांपत्यानं आपल्या मुलीला थेट हेलिकॉप्टरने  घरी आणून तिचं स्वागत केलं आहे.

अधिक वाचा  धक्कादायक : पाच महिलांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू |

माध्यमांतल्या वृत्तानुसार, पुणे जिल्ह्यातल्या शेळगाव इथल्या झरेकर कुटुंबात पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला. त्यामुळे या कुटुंबाने या नवजात मुलीचं भव्य स्वागत केलं. राजलक्ष्मी असं या नवजात मुलीचं नाव आहे. 22 जानेवारीला भोसरी येथे आजोळी तिचा जन्म झाला. तिला खेड तालुक्यातल्या शेळगाव इथल्या घरी नेण्यासाठी कुटुंबानं हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेतलं. हेलिकॉप्टर आणि बाळाला पाहण्यासाठी शेळगावमधल्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. जेव्हा ही बातमी सोशल मीडियावरून  व्हायरल झाली तेव्हा नेटिझन्सना मुलीच्या वडिलांचा हा अनोखा विचार आणि दृष्टिकोन आवडला. मुलीचा जन्म अप्रतिम पद्धतीनं साजरा केल्याबद्दल या दांपत्याचं नेटिझन्सनी विशेष कौतुक केलं आहे.

अधिक वाचा  ‘रानबाजार’मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ता माळीच्या आईने दिली प्रतिक्रिया

व्यवसायानं वकील असलेले राजलक्ष्मीचे वडील विशाल झरेकर यांनी `एएनआय` या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, `हेलिकॉप्टरसाठी आमच्या कुटुंबानं एक लाख रुपये खर्च केला. आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे आमच्या मुलीचा गृहप्रवेश विशेष ठरावा यासाठी आम्ही एक लाख रुपये खर्च करून खास हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. शेळगावमधल्या आमच्या शेतात उभारलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या हेलिपॅडवर हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं. मुलीच्या स्वागतासाठी फुलांचे हार आणण्यात आले. गुलाबाच्या पाकळ्या उधळून आई आणि मुलीचं स्वागत करण्यात आलं.`

`आमच्या कुटुंबात बऱ्याच वर्षांनी मुलीचा जन्म झाला. त्यामुळे याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी आणि माझ्या पत्नीनं राजलक्ष्मीला 2 एप्रिलला हेलिकॉप्टरनं घरी आणलं. यादरम्यान आम्ही श्री खंडोबाचे आशीर्वाद घेण्यासाठी जेजुरीला गेलो; पण तिथं हेलिकॉप्टर उतरण्यास अडचण असल्यानं आम्ही हेलिकॉप्टरमधूनच देवाचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली,` असंही विशाल झरेकर यांनी सांगितलं.