मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. पण, आता हा वाद आता आणखी शिगेला पोहोचणार असे संकेत खुद्द भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ‘दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू’ असा निर्धारच फडणवीस यांनी केला आहे.
भाजप पक्ष स्थापना दिननिमित्ताने मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
‘येत्या काळात मोठा संघर्ष उभा करावा लागणारं आहे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू. यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई ही थांबणार नाही. हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने उपस्थित करतो’ असं म्हणत फडणवीस यांनी नव्या संघर्षाचे संकेत दिले आहे.
‘पंतप्रधान मोदी जेव्हाही बोलतात तेव्हा आपल्याला ते दिशा दाखवतात. भाजपाची निर्मिती ही राष्ट्रवादातून झाली आहे. काश्मिरच्या मुद्यावरून मुखर्जी यांनी नेहरू मंत्री मंडळातून राजीनामा दिला होता. भाजपा हा विश्वातील मोठा पक्ष म्हणून नाव समोर आलं आहे. भाजपा पक्ष संपवण्याकरीता खूप प्रयत्न करण्यात आले. अनेक नेत्यांना आणीबाणी काळात २-२ वर्ष जेल मध्ये ठेवण्यात आले. अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हा २ होतो तेव्हा आम्ही घाबरलो नाही आणि आणि ३०० आहेत तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही’ असंही फडणवीस म्हणाले.