पुणे- महात्मा ज्योतिबा फुले मंडईतील महापालिकेने भाडेकराराने दिलेल्या गाळ्यांना 2020 पासून रेडीरेकनरनुसार भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेने करोना संपातच या गाळेधारकांना लाखो रुपयांची थकबाकीची बिले पाठविली असून गाळे वापरणाऱ्या व्यावसायिकांची झोप उडाली आहे.

या बिलाची तपासणी करून त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त रवींद्र बिनवडे यांनी दिले.

महापालिकेने केलेली ही दरवाढ अयोग्य असून ती तातडीने रद्द करावी तसेच थकबाकीची बिलेही माफ करावी या मागणीसाठी माजी नगरसेविका ऍड. रुपाली पाटील यांनी या गाळेधारकांसह महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त बिनवडे यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले. दरम्यान, या भाडेवाढीबाबत दैनिक ‘प्रभात’ने सर्व प्रथम आवाज उठवित 31 मार्च रोजी व्यावसायिकांच्या अडचणी ‘200 पट भाडेवाढ’ या वृत्ताद्वारे हा प्रकार समोर आणला होता.

अधिक वाचा  पुणे महापालिकेचे SC आणि ST चे आरक्षण जाहीर; आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष

ब्रिटिश काळापासून अनेक व्यावसायिकांचे इथे गाळे असून महापालिकेकडून 2019 पर्यंत त्यांना वर्षाला अडीच ते सात हजारांपर्यंत भाडे आकारले जात होते. मात्र, 2020 पासून पालिकेने ही भाडेवाढ थेट लाखांमध्ये नेली असून अनेक व्यावसायिकांना अवघ्या दोन वर्षांची तब्बल सात लाखांची बिले देण्यात आली आहेत. त्यातच, गेली दोन वर्षे करोनामुळे व्यवसाय बंद होते. अशा स्थितीत व्यावसायिकांना आधार देण्याऐवजी महापालिकेकडून त्यांच्यावर थकबाकी दाखवत त्यांच्याकडून गाळे काढून घेत त्यांना बेदखल करण्याचा घाट घातला असून तातडीने ही दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही निवडणुकांबाबत सरकार संभ्रमातच; तज्ञांच्या सल्ल्यावरच निर्णय

बिलांची तपासणी करणार : बिनवडे
मंडईतील गाळेधारकांना पालिकेकडून देण्यात आलेल्या बिलांची फेरतपासणी केली जाईल, असे आश्‍वासन अतिरिक्‍त आयुक्‍त बिनवडे यांनी व्यावसायिकांना दिले आहे. मंडई विभागाने अचानक एवढी बिले कशी दिली. त्याच्या मान्यता आहेत का याची तपासणी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, तसेच कोणत्याही व्यावसायिकावर अन्याय केला जाणार नाही, असे आश्‍वासन बिनवडे यांनी व्यावसायिकांना दिले.