पुणे- एसटी महामंडळाने अनेक संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. त्यापैकी पुणे विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू करुन घेण्याबाबत महामंडळाकडे अर्ज केले होते.अखेरीस संबंधित 44 कर्मचाऱ्यांना आता पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून संपावर आहेत. संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन, बर्डतर्फ, सेवा समाप्तीची कारवाई महामंडळाने केली होती. कारवाई झालेले कर्मचारी पुन्हा सेवेत हजर झाल्यास कारवाई मागे घेणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले होते. सासवड, स्वारगेट, राजगुरुनगर, शिवाजीनगर, दौंड या आगारांतील कर्मचारी रुजू झाले आहेत.सध्या पुणे विभागातील 13 आगारांतून सुमारे 300 बसेस धावत आहेत. तर फेऱ्यांची संख्या हजारांच्या घरात पोहोचली असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

अधिक वाचा  "काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?", शिवसेनेलाही लागली चिंता

निवृत्त वाहकांचीही नियुक्ती होणार ?
एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठी यापूर्वी महामंडळाने निवृत्त आणि कंत्राटी चालकांची भरती केली. मात्र, आता वाहकांची संख्या अधिक अपुरी ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता निवृत्त झालेल्या वाहकांना पुन्हा एकदा रुजू करुन घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. नियुक्तीच्या अनुषंगाने निकष सध्या महामंडळाकडून निश्‍चित करण्यात येत आहेत. याबाबत अंतिम निर्णय झाल्यास निवृत्त वाहकांना देखील सेवेत रुजू करुन घेण्यात येणार आहे.