पुणे– शहराच्या मध्यवर्ती भागांत मागील वर्षभरापासून रस्त्यांवर विविध कारणांनी खोदकाम करण्यात येत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीदेखील होत आहे. मात्र, आता उन्हामुळे वाहतूक कोंडी अधिक तापदायक ठरत आहे.महत्त्वाच्या रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अंतर्गत रस्त्यांवरदेखील कोंडी होत आहे.

मागील वर्षी लॉकडाऊनच्या दरम्यान पेठांमध्ये रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाळ्याच्या अनुषंगाने करण्यात येणारी कामे सुरू झाली. त्यावेळीपासून कधी पाण्याच्या लाईन, कधी गॅस लाईन, विजेच्या लाईन, रस्ते दुरुस्ती, फूटपाथ नूतनीकरण अशा एक ना अनेक कारणांसाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. त्यामुळे अद्याप मध्यवर्ती भागांतील रस्त्यांसाठी ‘सुरळीत वाहतूक’ ही दूरचीच गोष्ट ठरत आहे. सतत वाहनांची गर्दी आणि वर्दळ असणारे शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोडचे सातत्याचे खोदकाम करण्यात येत आहे. परिणामी मागील वर्षभरापासून पेठांमधील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी ठरलेलीच आहे.

अधिक वाचा  elecation Breaking : ..... तिथं निवडणुका घ्या! मराठवाडा, विदर्भाचा मार्ग मोकळा?

शाळांच्या रस्त्यांवरील पार्किंगची भर
लॉकडाऊननंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, व्हॅन, रिक्षांची संख्या वाढली आहे. पेठांमधील वर्दळीच्या रस्त्यांवर असणाऱ्या शाळांची संख्यादेखील अधिक आहे. दुपारी आणि सायंकाळी शाळांच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या एका बाजूची जागा ‘अघोषित’ पार्किंगसाठी वापरण्यात येते. परिणामी वाहनांना ये-जा करण्यासाठी अपुरी जागा उपलब्ध राहत आहे. .

भरदुपारी झालेल्या वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
लक्ष्मी रस्त्यावर शाळेच्या सुटण्याच्या वेळात रिक्षा, व्हॅन, बसेसचे पार्किंग रस्त्याच्या डाव्या बाजूला केले होते. तर उजव्या बाजूला नियमित पार्किंग होते. यामध्ये पीएमपी बसेसची देखील भर पडत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यातच शगुन चौकात सुरू असणाऱ्या खोदकामाचा परिणामदेखील वाहतुकीवर झाला होता