पुणे – रिंगरोडसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कामास गती मिळाली आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी प्राथमिक दर निश्‍चित करण्यात आले आहे.लवकरच त्यास मान्यता मिळाल्यानंतर अंतिम दर सर्व्हे नंबरनिहाय जाहीर केले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी 695 हेक्‍टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्यासाठी दर निश्‍चित करण्याचे काम गतीने सुरू आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दर आठवड्याला बैठका होत आहे. प्रामुख्याने जमिनीचे मूल्याकंन करताना एकसूत्रता आणणे, मूल्याकंन करताना कायद्यातील तरतूदींचे पालन आणि समृध्दी महामार्गाचे भूसंपादन करताना अवलंबलेली कार्यपद्धती याचा विचार करण्यात आला आहे.

अधिक वाचा  पुण्यात राज ठाकरे यांची दीड तासात तब्बल 50 हजार रुपयांची पुस्तकं खरेदी

प्राथमिक दर निश्‍चित करण्यात आले असून अंतिम दर हे सर्व्हे नंबर निहाय जाहीर केले जाणार आहे. जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार आहे, याची माहिती मिळणार आहे. मोबदल्यासाठीचे दर निश्‍चित करताना त्या गावात अथवा परिसरात मागील तीन वर्षात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या आधारे दर निश्‍चित करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.