येरवडा – आज सोडवतो, उद्या सोडवतो यातच पाच वर्ष नगरसेवकांनी घालविली. समस्या मात्र तशीच राहिली आहे. आमदारांनीही विधानसभेत तारांकित प्रश्‍न विचारला, त्यावर लवकरच ड्रेनेज लाइनचे काम सुरू होईल, असे मंत्र्यांनी सांगितले.पण, लक्ष्मीनगर गल्ली क्र.15 येथील रस्त्यावरील सांडपाणी आजही हटलेले नाही. हे नेते बिनकामाचेच आहेत.

ड्रेनेजलाइनची कामे झाली नसल्याने ड्रेनेज तुंबले की जेटिंग मशिन आणायची आणि साफ करायचे, अशी कसरत गली कित्येक महिने सुरू आहे. प्रत्येकाच्या घरासमोर सांडपाणी साचत आहे. घरात घाण वास येतो. पिण्याच्या पाण्याच्या लाइनमध्ये हे सांडपाणी मिसळत आहे. सकाळी पाच वाजता पाणी आले की दुर्घंधीयुक्‍त पाणी जाण्यासाठी एक तास नळ सुरू ठेवावा लागतो. सांडपाणीमिश्रीत पाणी वापरल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडत आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली, फोटो, व्हिडिओ देवुन आम्ही थकलोय, अशी व्यथा येथील शाबिरा शेख, सायरा ताहिर, इरफान शेख, हुसेन शेख, शमीम शेख, मुक्‍ता कानडे, चंदा शिंदे, राजश्री चौधरी, फरीदा शेख, साबीर शेख, विल्सन चंदेवळ, जनार्दन कुसळे यांनी मांडली.

अधिक वाचा  भारत अन् दक्षिणपूर्व आशियामध्ये उत्पादन वाढवण्याची Appleचा प्लॅन

रमझान महिन्यांत तरी समस्या सोडवा…
लक्ष्मीनगर येथील ज्वाला मित्र मंडळाजवळ रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचत आहे. या घाण पाण्यातूनच लोकांना यावे-जावे लागते. सध्या, रमजानचा महिना सुरू असताना या अस्वच्छतेकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, रमझान महिन्यात तरी समस्या सोडवा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.