शिवणे (पुणे) : नांदेड सिटी येथे ड्रेनेजच्या पाईप लाईनचे काम करत असताना परशुराम रंगप्पा मंगेरी (वय २४ रा.गोखलेनगर वडारवाडी) या तरुणाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.

आज (5 एप्रिल) सकाळी 09:30 वाजण्याच्या सुमारास परशुराम मंगेरी हा तरुण नांदेड सिटी येथील डेस्टिनेशन मॉल समोरील साईटवर काम करण्यासाठी आला होता. ड्रेनेजसाठी रस्ता खोदायीचे काम सुरू होते, सदर खोदकाम करत असताना परशुराम पाईपची लेव्हल तपासण्यासाठी 16 फूट खोल खड्ड्यात उतरला असता वरून अचानक डांबरी रस्त्याचा भाग आणि माती अंगावर पडून तो त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला.

अधिक वाचा  पुण्यात एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघड

त्यानंतर घटनास्थळी असलेल्या जेसीबी आणि पोकलेन, आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

पीएमआरडीए नांदेड सिटी अग्निशामक केंद्राचे सुजित पाटील, वाहनचालक अभिषेक गोणे, फायरमन योगेश मायनाळे, अक्षय तांबे, किशोर काळभोर, पंकज माळी, अक्षय काळे, ज्ञानेश्वर बुधवंत यांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास हवेली पोलीस ठाणे करत आहे.