मुंबई : मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरांनी भडका उडाला आहे. मुंबईत मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजी महागलं आहे. शहरात आज सकाळपासून सीएनजीच्या दरात सात रुपयांनी आणि पाईप्ड कुकिंग गॅसच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. नव्या दरानुसार मुंबईत सीएनजी 67 रुपये प्रति किलो आणि पाईप्ड कुकिंग गॅस 41 रुपये प्रति किलो झाला आहे. राज्य सरकारने वॅट कमी केला होता. त्यामुळे सीएनजीचे दर कमी होते. पण आता महानगर गॅस लिमिटेडने दर वाढवल्याने सामान्य मुंबईकरांना मिळालेला काहीसा दिलासाही आता नाहीसा झाला आहे.

महानगर गॅस लिमिडेटच्या निवेदनात नमूद केलं आहे की, “ग्राहक-केंद्रित कंपनी असल्याने आम्ही 8 लाखांहून अधिक CNG आणि 18 लाखांहून अधिक घरगुती पाईप्ड गॅस ग्राहकांसाठी किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.”

अधिक वाचा  मंदिर जेवढं जुनं आहे, तितकीच मशिदही जुनी आहे, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

राज्य सरकारने सीएनजीवरील वॅट 13.5 टक्क्यांनी कमी केला होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना वॅट कमी करण्याची घोषणा केल्यानंतर त्यानंतर अधिसूचनाही जारी झाली होती. 1 एप्रिलपासून बदललेले नवीन दर लागू झाले होते. यामुळे महाराष्ट्रात सीएनजी प्रतिकिलो सहा रुपये आणि पाईप्ड कुकिंग गॅस प्रति किलो साडेतीन रुपये स्वस्त झाला होता.

वॅट कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला

परंतु वॅट कमी केल्याचा फायदा सामान्य मुंबईकरांना फार दिवस मिळाला नाही. या दिलासा मिळून पाच दिवस होत नाहीत तोपर्यंत सीएनजी प्रति किलो सात रुपये आणि पाईप्ड कुकिंग गॅस प्रति किलो पाच रुपयांनी महागला आहे. महानगर गॅस लिमिटेच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाल्याने आज सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना सीएनजी आणि पाईप्ड कुकिंग गॅसमधील दरवाढ पाहायला मिळेल. मुंबईसह राज्यभरात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. महाराष्ट्राच्या परभणीत पेट्रोलने 122 रुपये लिटर दर पार केला आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या वाढलेल्या दरांनी सामान्याचं जगणंच कठीण केलं आहे.

अधिक वाचा  वयाच्या 54 व्या वर्षी 'या' बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ

टॅक्सी, रिक्षा भाडेवाढीची मागणी

तीन लाख खाजगी वाहनांव्यतिरिक्त, शहरात पाच लाख सार्वजनिक वाहतूक वाहनं आहेत, ज्यात रिक्षा, टॅक्सी आणि बस यांचा समावेश आहे, जे नैसर्गिक इंधनावर अवलंबून आहेत. सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीचा मोठा फटका टॅक्सी आणि रिक्षाचालकांना बसत आहे. परिणामी टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात दोन ते पाच रुपयांनी वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

ओला, उबरही दरवाढ करण्याच्या तयारीत

तर सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीनंतर ओला आणि उबरसारख्या मोबाईल ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांनीही भाड्यामध्ये वाढ करण्याची तयारी केली आहे. सीएनजीच्या दरात झालेली वाढ पाहता, प्रवाशांसाठी कॅबमधील एसी चालू करण्याची आमची अजिबात तयारी नाही. वाढलेल्या किमतीमुळे आमचं बजेट कोलमडलं आहे, अशी प्रतिक्रिया एका कॅब चालकाने दिली.