कोल्हापूर : राज्यातील जलविद्युत प्रकल्प खासगी करण्याचा घाट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घातला आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केला.

हातकंणगले तालुक्यातील चोकाक येथे आज (ता. ५ एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. त्याच वेळी त्यांनी जयंत पाटील व पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की एक नाही तर अनेक धोरणं महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतली आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मदत द्यायला पाहिजे होती. पण, दोन्ही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी; म्हणून पदयात्रा काढली. त्या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीला बोलवलं होतं. पण, त्याठिकाणी त्यांनी सांगितलं एक आणि केलं दुसरंच.

अधिक वाचा  जपानची संशोधनासाठी शुभमला ‘मेक्स्ट’ शिष्यवृत्ती;

निवडणूक लढवता यावी; म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. चळवळ टिकावी; म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला आहे. एनडीएला पाठींबा देण्याचा निर्णय का घेतला, तर घोटाळा झाल्याचे वातावरण तयार झाले होते. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले होते की एक स्वछ सरकार पाहिजे. काळा पैसा भारतात आणणारे कुणीतरी पाहिजे; म्हणून (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्तीने आम्ही ‘एनडीए’मध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी आम्ही मोदी यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात, हे विचारलं होतं. त्यावेळी मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार, असं बोलले होते. त्याचवेळी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणार, असं आश्वासन दिलं, तर शेतकरी तुमच्याबरोबर येईल, असं मी म्हणालो होतो, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  अयोध्या दौऱ्याला विरोधाची रसद महाराष्ट्रातूनच पुरवली ; राज कडाडले

ते म्हणाले की, मी मान्य करतो की, वेळोवेळी आमच्या भूमिका बदलल्या आहेत. पण शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील, या आशेने आमच्या भूमिका बदलल्या होत्या. सध्या आम्ही दररोज ईडीच्या बातम्या ऐकतो आहोत. पण, या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 22 हजार कोटी रुपयांना फसवलं आहे. तिकडे ईडी का पाहत नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मग, या विमा कंपन्यांना ईडी का कारवाई करत नाही.