नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत भाजपने चार राज्य जिंकल्यानंतर आता भाजप नेत्यांकडून आगामी निवडणुकीत महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर आगामी मुंबई महापालिकेच्या  निवडणुकीत शिवसेनेला हद्दपार करू असा दावा भाजप करत आहे.

त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवलेंनी सुरात सूर मिसळला आहे. आगामी काळात मुंबईत भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर होईल. तसेच पिंपरी चिंचवडमध्येही आरपीआय चा उपमहापौर होईल, असा दावा आठवले यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रविवारी (दि. ३) सायंकाळी पिंपरी येथे सत्ता संकल्प मेळावा झाला. यावेळी आठवले बोलत होते. यावेळी बोलताना आठवले यांनी आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत भाष्य केले.

अधिक वाचा  पुणे लाल महाल लावणी प्रकरण अंगाशी, नृत्यांगना वैष्णवी पाटील विरोधात गुन्हा

याबाबत बोलताना पुढे आठवले म्हणाले, राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करणार असून सर्व महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युतीची सत्ता स्थापन होईल या संकल्पाने कामाला लागा, असे आवाहन आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.

पुढे बोलताना आठवले यांनी सन 1990 ची आठवण करून दिली. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘मुंबईत सन 1990 मध्ये आरपीआय काँग्रेस युतीने शिवसेनेची सत्ता उलथवून लावली होती. मुंबईचे महापौरपद आरपीआयला मिळाले होते. या इतिहासाची पुनरावृत्ती आम्ही करणार आहे. मुंबईत शिवसेनेची सत्ता उलथवून भाजप आरपीआयची सत्ता आणणार, असा निर्धार आठवले यांनी केला.

अधिक वाचा  राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजेंचे नवे पोस्टर चर्चेत?

दरम्यान, कॉंग्रेसच्या काळात मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. कॉंग्रेसने ती संधी दिली नाही. पण मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. कारण जनता माझ्या पाठिशी आहे, असे आठवले म्हणाले. तसेच आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आठवले जोमाने मैदानात उतरले आहे.