मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्ती ईडीने जप्त केली. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात तपास सुरू असतानाच ईडीने ही कारवाई केली. या कारवाईवरून संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. एक रुपयाही अशा पद्धतीने आमच्या खात्यावर आला असल्याचं आढळलं, तर संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करेन, असं विधान राऊतांनी केलं. याचवेळी त्यांनी हरेन पंड्या यांच्या हत्या प्रकरणाचा उल्लेख करत भाजपला खुलं आव्हान दिलं.

ईडीच्या कारवाईवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मला कल्पना होती की, ईडी मागे लागली आहे. ज्या पद्धतीने आम्ही हे सरकार स्थापन केलं. माझ्यावर कशा पद्धतीने दबाब येतोय, याबद्दल मागे मी व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी आणि त्यांना (भाजप) हवं असलेलं सरकार आणण्यासाठी मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा मागे लागतील. अटक करण्याचाही इशारा मला दिलेला आहे. त्या पत्रात हे लिहिलेलं आहे,” असं राऊतांनी स्पष्ट केलं.

“मला या कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. कुणाला जर असं वाटत असेल की, अशा कारवायांमुळे संजय राऊत किंवा शिवसेना खचली आहे. सुडाच्या कारवाया, असत्य कारवायांपुढे आम्ही कधीही गुडघे टेकवणार नाही. आज ते जे काही सांगत आहेत. आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेलं घर असेल, जन्मगावी असलेली जमीन असेल. ती एक एकरही नाही. भाजपचे नाचे या कारवायांवर नाचत आहेत, तर हा राजकीय दबाब आमच्यावर आणि सरकारवर आहे,” असा आरोप राऊतांनी केला.

अधिक वाचा  OBC आरक्षणावरून आघाडीत बिघाडी? पटोलेंचा मुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्ष इशारा

“ते जे शब्द वापरत आहे की, मनी लाँडरिंग, १४०० कोटी… अशा प्रकारचा एक रुपया माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल आणि आम्ही तो कुठे वापरला असेल, तर सगळी संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करायला तयार आहोत. भाजपच्या खात्यावर, हे भिकारी लोक आहेत. त्यांचं स्वतःचं काही नाही. खरंतर यांचे देणगीदार आहेत, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. पण, आमच्या सारखे मराठी मध्यमवर्गीय लोकांवर कारवाई होतेय,” असंही राऊत म्हणाले.

“हा एक सूड आहे. बघा आम्ही तुम्हाला घरातून बाहेर काढलं. इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण मी कधीही बघितलं नव्हतं. राहत्या घरावर जप्तीची कारवाई करत आहेत. हे घरं जप्त करण्याआधी आम्हाला कळवलं पाहिजे. मी ईडीच्या नोटिशीची वाट बघतोय. अलिबागच्या जागेसंदर्भातील असो वा दादरमधील. दादरमधील व्यवहाराची संपूर्ण माहिती मी प्रतिज्ञा पत्रात दिलेली आहे. ५५ लाख रूपये कर्ज असल्याचं. ते पैसे परतही केले आहेत. हे आयकर विभागालाही कळवलं आहे. काहीही लपून केलेलं नाही,” असा खुलासा राऊतांनी या प्रकरणावर केला.

अधिक वाचा  “घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला”; सभेनंतर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया

“पत्राचाळ कुठेय हे मला माहिती नाही. मात्र कोणतीही गोष्ट खोटी करायची म्हटल्यावर ते कोणत्याही थराला जातात. आरोपपत्रात कुणी काहीही टाकू शकेल. नीरव मोदी, मेहुल चौक्सी हे पंतप्रधानांसोबत परदेशी दौऱ्यावर गेले आणि त्यांनी घोटाळे केले. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांशी नाव जोडायचं का? तर असं होत नाही. प्रकरणाचा अभ्यास नीट केला पाहिजे. जे यात पडलेत, त्यांना पडू द्या. उड्या मारू द्या. हे तोंडावर आपटतील,” अशी टीका राऊतांनी भाजप नेत्यांवर केली.

“काय कराल, डोक्याला बंदूक लावाल ना? माझी तयारी आहे. ईडी असेल, सीबीआय असेल. भाजपने आमच्यावर जे भाडोत्री लोक सोडलेत ते. संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही. तुम्ही जे खोटं कराल,ते तुमच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्यासाठी खड्डा खोदायला सुरुवात केली आहे. प्रॉपर्टीज हा आमचा धंदा नाही. महाराष्ट्रात कष्टाने कुणी दोन गोष्टी घेत असेल आणि हे मराठी लोक दात धरून असतील ना तर मुंबई मराठी माणसाची आहे, वसूल करू,” असा इशारा राऊतांनी सोमय्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला.

अधिक वाचा  धरमेर देवस्थान मंदिराचा दुर्लक्षित बौद्धवाडी भूखंड भूमिपूजनाने पूर्नस्थापित

“मी मौनात जाणार नाही. ते मौनात जातील. मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर ३० वर्षे काम केलेला माणूस आहे. माझ्या धमन्यांमध्ये शिवसेना आहे. काय करणार तुम्ही (भाजप)? मी म्हटलं ना डोक्याला बंदूक लावाल ना? सकाळी वॉकला जातो, तेव्हा हरेन पंड्याप्रमाणे मला माराल. अजून काय करणार? हरेन पंड्याप्रमाणे गोळी माराल. माझं आव्हान आहे, मारून दाखवा. तुमच्यावर ती गोळी उलटेल,” असं खळबळजनक विधान राऊतांनी केलं.