मुंबईः राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडीला मंत्रिमंडळ फेरबदलाचे वेध लागले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांकडून परवानगी मिळत नसल्याने निदान मंत्रीमंडळ फेरबदलाचा तरी मुहूर्त काढला जावा, यासाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीकडून पुढाकार घेण्यात आल्याचे कळते. त्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते येत्या ७ आणि ८ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून संजय राठोड याना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे खाते सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या देशमुख हे ईडीच्या अटकेत आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास निम्मा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी फेब्रुवारी २०२१मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे आणि या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची सदस्यपदाची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती या दोन महत्त्वाच्या पदांमध्ये काही अदलाबदल शक्य आहे का, याचीही आघाडीमध्ये चाचपणी सुरू असल्याचे समजते.

अधिक वाचा  पुण्यातील 'रुबी रुग्णालय रॅकेट' प्रकरणात ट्विस्ट, मध्यस्थीनीही एक-एक मूत्रपिंड दिल्याचे उघड

पटोले यांना मंत्रीपद?

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून नाना पटोले यांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मंत्रीमंडळातील वाढीव कोट्यातील सर्व जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींकडून जोपर्यंत त्यांच्या वाट्याच्या मंत्र्यांच्या खांदेपालटाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ फेरबदल शक्य नाही. शिवाय शासकीय महामंडळावरील नेमणुका रखडल्या आहेत. नाराज आमदारांना महामंडळावर सामावून घेण्याची आघाडीत चर्चा आहे. मात्र, महामंडळ नियुक्त्यांना मुहूर्त मिळत नसल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या २५ नाराज आमदारांनी निधीवाटप, मतदारसंघातील कामे होत नसल्याबद्दल थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्यात ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा घडते आणि त्याचे काय फलित होते, याकडे लक्ष आहे.