पुणे –चारित्र्यावर संशय घेत असल्याने महिलेने पतीचा खून केला. यात तिने स्वत:च्या अल्पवयीन मुलाची मदत घेतली. ही घटना कात्रज येथे सोमवारी उघडकीस आली. खुनानंतर दोघांनी मिळून मृतदेह पाइपला लटकवला होता.याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे, तर मुलगा 17 वर्षांचा असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

प्रकाश किसन जाधव (42) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर शालन जाधव (37) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे प्रकाश जाधव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. दरम्यान, जाधव यांचा गळा दाबून तसेच डोक्‍यावर मारहाण करून खून केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी तातडीने तपास केला असता, हा खून जाधव यांच्या पत्नीने त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली सांगितले. पोलीस निरीक्षक संगीता यादव या घटनेचा तपास करत आहेत.

अधिक वाचा  जाधवांचा पाय खोलात! इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

असा लागला छडा
घटनेच्या दिवशी जाधव दाम्पत्यात भांडणे झाली होती, अशी माहिती पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे आणि शिवदत्त गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार तपास अधिकारी वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शालनकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने कृत्याची कबुली दिली.