खडकवासला – धानोरी मध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यास घडलेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दोन किंवा तीन क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी संयुक्‍तपणे कारवाई करीत आहेत.

आजही सिंहगड रोडवरील कारवाईत वारजे, सिंहगड रोड आणि धनकवडी या क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. तसेच, मोठा पोलीस बंदोबस्त तसेच अन्य पथके बरोबर असल्या कारणाने कारवाईस कोणीही विरोध केला नाही. याउलट खडकवासलामध्ये कारवाई करण्यापूर्वीच तेथील नागरिकांनी अधिकाऱ्यांना विनवण्या करीत अतिक्रमण काढण्यास मुदत मागितली. त्यानुसार चार दिवसांची मुदत देण्यात आली असून शुक्रवानंतर अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड पासून खडकवासल्यापर्यंत महानगरपालिकेच्या कारवाईत अनेक बेकायदा अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील कारवाईसाठी तीन क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांबरोबरच 10 जेसीबी, ट्रक, चार मोबाइल व्हॅन, चार पोलीस अधिकारी आणि 110 पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिचे 150 कामगार, असा मोठा फौजफाट्यासह सहभागी झाले होते. खडकवासलातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यापूर्वी ती स्वत: काढावीत, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली असून चार दिवसांची म्हणजे शुक्रवार (दि. 8) पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अधिक वाचा  भाजपने राजकारणाचा स्तर घालवला, "आता किमान..."; रोहीत पवारांची भाजपवर टीका

नागरिकांनी व्यक्‍त केले समाधान…

नांदेड फाटा परिसर अतिक्रमण मुक्‍त करण्यात आल्याने सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले. सिंहगड रोडवरील नांदेड फाटा चौकात पादचाऱ्यांसाठी चालणेही कठीण झाले होते. अतिक्रमणे काढल्यामुळे पादचाऱ्यांना काही दिवस तरी अडथळ्याशिवाय वाट मिळेल. दुकानापुढे विनापरवाना वाढवलेली पत्र्याचे शेड आणि मोठे बोर्ड, यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणेही अवघड जात होते तसेच दुकानात जाणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करीत होते, यातून वाहतूक कोंडी होत असल्याने पालिकेसाठीही डोकेदुखी ठरत होते.

सिंहगडरोडवरील नव्याने समाविष्ट गावातील मिळकत धारकांनी आपल्या मिळकतींच्या नोंदीचे दाखले महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना द्यावेत. अन्यथा ती बेकायदेशीर समजून पुढील काळात कारवाई करण्यात येईल.

अधिक वाचा  बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ नावाचं भगवं वादळ कायम, तीन दिवसांत जमवला 9.08 कोटींचा गल्ला

मोठी कारवाई…
सिंहगडरस्ता, -महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार क्षेत्रीय कार्यालयाकडून सिंहगड रोडवर करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईत 18 पहाड मांडव, 119 खांबावरील जाहिराती, 1800 चौरस फुटाचे फ्लेक्‍स बॅनर्स काढून टाकण्यात आले तसेच पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय पुणे मनपाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या उभारलेले मोबाइल कंपन्यांचे 12 नामफलक काढून टाकण्यात आले आहेत.

सदर कारवाई परिमंडळ क्र.3चे उपायुक्त जयंत भोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्‍त संजीव ओव्हाळ यांच्या नियंत्रणाखाली सुमारे 70 अधिकारी कर्मचारी तसेच विद्युत विभागाचे 2 कर्मचारी यासह अन्य पथकांकडून करण्यात आली. बांधकाम निरीक्षक निशिकांत छापेकर, धनंजय खोले तसेच अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड, आकाश चिन्ह निरीक्षक युवराज वाघ व अजित जोगळेकर यांनीही यामध्ये सहभाग घेतला.