पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ सुरू केले असून, त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या अनेक कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्या एकत्रित प्रयत्नातून ‘स्टिक’ या उपक्रमांतर्गत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्‍यक कौशल्ये या माध्यमातून देण्यात येतील तसेच या व्यासपीठाच्या माध्यमातून वैश्‍विक स्तरावर संधीही निर्माण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य संतोष ढोरे उपस्थित होते.

अधिक वाचा  'धर्मवीर' सिनेमात राज ठाकरे आणि राणे असल्याने उद्धव ठाकरेंनी क्लायमॅक्स पाहिला नाही',नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

डॉ. करमळकर म्हणाले, जग सातत्याने बदलत असताना काल जे घडलं ते आज अभ्यासक्रमात येण्याची गरज आहे. यासाठी विद्यापीठाकडून सिफोरआयफोर, डिग्री प्लस सारखे उपक्रम घेऊन येत आहे. ‘स्मार्ट इंटरव्ह्यू’ हेही तशाच प्रकारचे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी’ बनविण्यासाठी व जगातील कंपन्यांशी जोडण्यासाठी त्याची मदत होईल.