पुणे – उन्हाळ्यामुळे लिंबू, हिरवी मिरचीची आवक कमी होत आहे. एरवी एक रुपयांना मिळणाऱ्या एका लिंबाची विक्री किरकोळ बाजारात दहा रुपये दराने केली जात आहे. मिरचीचे भावही तेजीत आहेत.एक किलो मिरचीची विक्री प्रतवारीनुसार 120 ते 160 रुपये भावाने केली जात आहे.

घाऊक बाजारात दहा किलो हिरवी मिरचीची विक्री 400 ते 700 रुपये भावाने केली जात आहे. उन्हाळ्यामुळे लिंबू तसेच मिरचीच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात लिंबाच्या एका गोणीचा भाव 700 ते 1,550 रुपये होता. रविवारी (3 एप्रिल) लिंबाच्या एका गोणीची विक्री दोन ते अडीच हजार रुपये दराने करण्यात आली. एका गोणीत आकारमानानुसार 350 ते 450 लिंबे असतात, असे मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.

अधिक वाचा  सत्ता आल्यास EVM वर बंदी काँग्रेसचा मोठा निर्णय; देशव्यापी यात्रा निघणार

हिरवी मिरचीचा बाजारात तुटवडा जाणवत असून उन्हाळ्यामुळे मिरचीच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारात गावरान मिरचीची आवक कमी होत आहे. परराज्यातील हिरवी मिरची टिकाऊ नसते. पूर्वी मिरचीची आवक गोणीतून व्हायची. गेल्या काही वर्षांपासून मिरचीची आवक प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून केली जात आहे. उन्हाळ्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांमधून पाठविण्यात येणारी मिरची खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्लॅस्टिक पिशवीत उष्णता शोषली जाते. त्यामुळे मिरचीच्या प्रतवारीवर परिणाम होऊन मिरची खराब होते

गेल्या काही दिवसांपासून लिंबे, मिरचीची आवक कमी प्रमाणावर होत आहे. उन्हाळ्यामुळे लिंबू, मिरचीच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री दहा रुपयांना केली जात आहे. मिरचीचीही चढ्या भावाने विक्री होत आहे.