पुणे : महाराष्ट्रातबैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारला आहे.राज्याच्या विविध भागांमध्ये शर्यतींचं आयोजन केलं जात आहे. अशातच पुण्यात (Pune) बैलगाडी शर्यत सुरु असताना एक अपघात झाला. मात्र नशिब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आणि तरुणाचा जीव थोडक्यात वाचला. बैलगाडा घाटात शर्यत सुरु असताना मालक समोरुन धावत असलेल्या घोडीवरुन खाली पडला, मात्र मुक्या प्राण्यांनीच मालकाचे प्राण वाचवल्याचं पाहायला मिळालं. समोर मालक पडल्याचं पाहून बैलजोडीनं त्याला न तुडवता उडी मारुन आपलं मार्गक्रमण सुरु ठेवलं. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे.

अधिक वाचा  देहू नगरीत पंतप्रधान येणार; शिळा मंदिराचं लोकार्पण

नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या बैलगाडा शर्यतीतील ही घटना समोर आली आहे. बैलगाडा घाटात शर्यत सुरु असताना पुढून धावणाऱ्या घोडीवरुन बैलगाडा मालक खाली पडला. खरं तर यावेळी शर्यत ऐन रंगात आली होती. मागून बैलजोडी वेगाने धावत येत होती. त्यामुळे हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाता अक्षरशः ठोका चुकला. अनेकांच्या तोंडून आपसूकच ‘अर्र…’ असे उद्गार निघाले.

मुक्या प्राण्यांच्या प्रेमाने वाचवलं

तीन वेळा बैलांच्या आणि घोड्याच्या पायाखाली येऊन तरुण चिरडला जाण्याची भीती होती. मात्र बैलजोडीच्या प्रसंगावधानामुळे मालक थोडक्यात बचावला. मालक समोर रस्त्यात खाली पडल्याचं पाहून वेगवान धावणाऱ्या बैलजोडीला गती आवरणंही शक्य झालं नसतं. मात्र त्यांनी मालकाला न तुडवता त्याच्यावरुन उडी मारली आणि आपलं मार्गक्रमण सुरु ठेवलं. त्यानंतर मालक उठून उभा राहत चालत बाजूला गेला. त्यामुळे मुक्या प्राण्यांचे मालकावर किती प्रेम आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो.