पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला  यांनी करोना  संसर्गाच्या संभाव्य चौथ्या लाटेसंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. देशात करोनाची चौथी लाट जेव्हा केव्हा येईल तेव्हा ती सौम्य स्वरुपाची असेल. या संदर्भात मला कोणतेही भाकित करायचे नसून करोनाच्या नव्या म्यूटंट्सना आपल्या देशाने दिलेला प्रतिसाद पाहिल्यास देशातील लस इतर देशांमधील लशींच्या तुलनेत कितीतरी पटीने चांगली आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आहे.

पुण्यात अल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्हला उपस्थित राहिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोविडशील्ड बूस्टर डोसबद्दल  प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बूस्टर डोसबद्दल आम्ही काही महिन्यांपासून सरकारला आवाहन केले आहे. याचे कारण प्रवास करणार्‍या प्रत्येकाला बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. सरकारअंतर्गत देखील या संदर्भात चर्चा होत आहे. सरकार लवकरच बूस्टर धोरणाची घोषणा येत्या काही दिवसांत करेल असे वाटते असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  पुण्यात आता सीएनजी ८० रुपये; तीन दरात चौथी 2 रुपये 70 पैशांची वाढ

इतर सर्व देश बूस्टर डोस देत आहेत. आता भारताने देखील याकडे पाहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने विलक्षण काम केले आहे. मोदी सरकारने आधीच संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला दोन डोस देऊन कव्हर केले आहे आणि आता बूस्टरची वेळ देखील आली आहे. सीरमने यासंदर्भात आवाहन केले असून आम्हाला खात्री आहे, की सरकार बूस्टर डोसबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा अदर पूनावाला यांनी व्यक्त केली आहे .

पूनावाला म्हणतात,’चौथी लाट…’

दरम्यान, चौथी लाट जेव्हा येईल तेव्हा ती सौम्य असेल, आणि मला कोणतेही भाकित करायचे नाही, परंतु, आपण नवीन उत्परिवर्ती (म्यूटंट) प्रकारांना आपल्या देशाने कसा प्रतिसाद दिला आहे हे पाहिल्यास आपल्या देशातील लशी इतर देशांच्या लशींपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या सिद्ध झाल्या आहेत. जगभरातील लशींच्या मिश्रणास बूस्टर डोससाठी परवानगी आहे. लशींचा पुरेसा साठा आहे आणि कोणतीही कमतरता भासणार नाही. लशीच्या उपलब्धतेबाबत बोलताना ‘बहोत माल है’ असे म्हणत अदर पूनावाला यांनी देशातील नागरिकांना आश्वासित केले आहे.