उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ते संन्यासी आहेत आणि त्यावर आतापर्यंत अनेक लेख तसंच पुस्तकं देखील आली आहेत. पण ते ज्या संप्रदायाशी संबंधित आहेत त्याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायाशी संबंधित आहेत. नाथ संप्रदायाला एक गूढतेचं वलय लाभलेलं आहे. महाराष्ट्रात देखील नाथ संप्रदाय आढळतो आणि या नाथ संप्रदायाचं आणि वारकरी संप्रदायाचं जवळचं नातं आहे.

“हिंदू ध्यावै देहुरा, मुसलमान मसीत

जोगी ध्यावै परमपद, जहाँ देहुरा न मसीत”

म्हणजे, हिंदू देवळात ध्यान करतात, तर मुसलमान मशिदीत, परंतु जोगी ज्या परमपदाचे ध्यान करतात, तिथे देऊळ नाही वा मशीदही नाही. वरील रचना आहे ‘गोरखबानी’तली. म्हणजे, गोरक्षनाथांची.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या संप्रदायाचे अनुयायी आहेत, त्या नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ हे महत्त्वाचे सिद्ध सत्पुरुष. नाथ संप्रदायाचं भारतातील केंद्र मानल्या जाणाऱ्या गोरखपीठाचे योगी आदित्यनाथ हे पीठाधीश्वर सुद्धा आहेत. आता योगी आदित्यनाथ यांचं राजकारण आणि गोरक्षनाथांचे विचार, यांमधील साम्य आणि तफावत हा वादाचा मुद्दा व्हावा, हे सांगणारी ही गोरक्षनाथांची रचना आहे. त्यामुळे अनेकांना गोरक्षनाथ आणि नाथ संप्रदायाबद्दल कुतुहल असतं. त्याचसोबत, आणखी एक गोष्ट मराठीजनांसाठी कुतुहलाची ठरते. ती म्हणजे, या नाथ संप्रदायाचं ‘महाराष्ट्र कनेक्शन’.

काय आहे हे महाराष्ट्र कनेक्शन, मुळात नाथ संप्रदाय काय आहे, गोरक्षनाथ कोण होते, नाथ संप्रदायाचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध कसा आला, या संप्रदायावर तुकाराम महाराजांनी प्रचंड टीका का केली होती? एक-एक करून या सर्व कुतुहलजनक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. त्यासाठी आपल्याला साधारण एक हजार वर्षं मागे जावं लागेल आणि तिथून आजच्या गोरखपुरात, म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघापर्यंत यावं लागेल. चला तर मग जाणून घेऊया, नाथ संप्रदायाचं महाराष्ट्र कनेक्शन.

सुरुवात नाथ संप्रदाय नेमका आहे काय इथून करू.

‘मध्ययुगीन भारतीय साधनेची गंगोत्री’
नाथ संप्रदायाचं मोजक्या शब्दात नेमकं वर्णन करायचं झाल्यास आपल्याला रामचंद्र चिंतामण ढेरे अर्थात रा. चिं. ढेरेंच्या शब्दात सांगणं उचित ठरेल. महाराष्ट्राची लोकपरंपरा आपल्या संशोधनातून जपण्याचं कार्य रा. चिं. ढेरेंनी केल्याचं आपण जाणतोच. ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या आपल्या पुस्तकात रा. चिं. ढेरे म्हणतात, “नाथ संप्रदाय हा संपूर्ण विशाल भारतावर प्रभाव गाजवणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाने देश, काल, धर्म, वंश आणि भाषा यांच्या सीमा ओलांडून लोकाभिमुख दृष्टीने जनमानसाचं प्रबोधन केलं.’

एवढंच वर्णन करून रा. चिं. ढेरे थांबत नाहीत, तर ते पुढे म्हणतात की, ‘नाथ संप्रदाय ही मध्ययुगीन भारतीय साधनेची गंगोत्री आहे. ‘या नाथ संप्रदायाच्या स्थापनेचा काळ हा दहाव्या शतकाच्या आसपास आढळतो. खरंतर भारतातील लोकपरंपरांचे जाणकार, संशोधक हे नाथ संप्रदायाच्या उदयाचा काळ हा वेगवेगळा सांगतात. मात्र दहाव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यानचा हा काळ असल्याबाबत अनेकांचं एकमत दिसत. मराठीत दरवर्षी ‘रिंगण’ विशेषांक प्रसिद्ध होतो. पत्रकार सचिन परब हे या विशेषांकाचे संपादक आहेत. दरवर्षी एका संतावर हा विशेषांक असतो. यातील निवृत्तीनाथांवरील अंकात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक नंदण राहणेंचा लेख आहे. त्यात त्यांनी नाथ संप्रदायाद्दल अधिक विश्लेषण केलं आहे.

नंदन राहणे लिहितात की, नाथ संप्रदाय मध्ययुगातल्या भारतीय धर्मजीवनातले एक अतिशय गूढ प्रकरण आहे. साधारणपणे दहाव्या शतकापासून नाथांचा वावर भारतभर सर्वत्र झाल्याचं दिसतं. या पंथाचा प्रारंभ आदिनाथापासून झाल्याचं सर्व मानतात. आदिनाथ म्हणजेच शंकर, यावरही सर्वांचे एकमत आहे. मग येतात मच्छिंद्रनाथ, मानवी देहधारी पहिले नाथ ते हेच असं सर्व मानतात. त्यांच्यासह पुढे एकंदर नऊ नाथ मुख्य असल्याचं सांगितलं जातं. मात्र, वेगवेगळ्या परंपरांमध्ये त्यांची नावं वेगवेगळी येतात.

या नाथमंडळींच्या संचाराची व्याप्ती कच्छपासून कामरूपर्यंत आणि काश्मीरपासून केरळपर्यंत अशी सर्व भारतभर आहे. त्यांच्या कथा ऐकल्या की स्थळ, काळ, वर्ण, जाती, नाम, रूप या सगळ्यांच्या पलिकडे ते असल्याचे लक्षात येतं. मात्र, नऊ प्रमुख नथांमध्ये गोरक्षनाथांचं महत्त्व मोठं आहे.

नाथ संप्रदायाचा प्रसार सर्वत्र झाला असला तरी त्याचा उगम आताच्या भारताचा नकाशा नजरेसमोर ठेवल्यास उत्तरेकडील मानला जातो. या संप्रदायातील मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे उत्तरेकडील असल्यानं हा संप्रदायही उत्तरेकडचाच मानला जातो. मात्र, यातही अनेकांचे मतभेद आहेत. मात्र, दारोदार भिक्षा मागत हिंडणारे नाथयोगी हिंदी भाषेचा वापर करत असतात. त्यामुळे काहीजण नाथ संप्रदाय उत्तरेकडील असल्याच्या दाव्याला दुजोरा देतात.

अधिक वाचा  पाकिस्तानचा सामान्य माणूस आपला विरोधक नाहीत, शरद पवारांचे पुण्यात वक्तव्य

नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांचं महत्त्व फार मोठं मानलं जातं. याच गोरक्षनाथांचे आपण अनुयायी असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगतात. किंबहुना, गोरक्षनाथांच्या नावे असलेल्या गोरखपीठाचे ते पीठाधीश्वरसुद्धा आहेत. हे गोरक्षनाथ कोण होते, आणि यांचा पुढे महाराष्ट्राशी कसा संबंध आला, तसंच महाराष्ट्रात त्यांच्या काय खाणाखुणा आहेत, हे आपण जाणून घेऊ.

योगी आदित्यनाथ ज्यांना मानतात, ते गोरक्षनाथ कोण होते?

आदिनाथांचे शिष्य मच्छिंद्ननाथ (मत्स्येंद्रनाथ), मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, अशी एक सोपी ओळख सांगता येईल. इथं गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, नाथ संप्रदायात गुरू-शिष्य परंपरा आहे. म्हणजे, गुरूनं त्याचा शिष्य निवडायचा आणि त्याला दीक्षा द्यायची. ही दीक्षा गूढ पद्धतीची आहे. हा उल्लेख पुढे महाराष्ट्र कनेक्शन समजून घेताना अत्यंत महत्त्वाचा आहे. तर गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य. म्हणजे, त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. नाथ संप्रदायातील पहिला ऐतिहासिक पुरुष म्हणून मच्छिंद्रनाथांची नोंद आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरू-शिष्यांविषयी कमालीची गूढता इतिहासात दिसून येते.

महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ महाराजांमध्ये गुरू-शिष्य म्हणून जे नातं होतं, ते मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथांमध्ये मानलं जातं. गोरक्षनाथांचं वर्णन करताना रा. चिं. ढेरे म्हणतात की, “आत्मशुद्धी हेच आत्मसाक्षात्काराचे महाद्वारे आहे, असा शतकंठांनी घोष करणारा, अधोगत भारतीय साधनेचा उद्धारकर्ता, स्त्री-शुद्रांचा त्राता, लोकभाषांचा आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचा प्रथम पुरस्कर्ता आणि भारतीय जनजीवनाला आत्मोन्नतीच्या वाटेवर खेचणारा समर्थ नेता म्हणून श्री गुरू गोरक्षनाथ इतिहासात चिरंजीव झाले आहेत.”

भारतीय साधनेच्या इतिहासात युगकार म्हणून गोरक्षनाथांना मान दिला जातो. बाराव्या शतकातला किंवा त्याच्या आसपासचा काळ हा गोरक्षनाथांचा मानला जातो. संशोधकांमध्ये यातही दुमत असलं तरी हाच काळ अनेकांनी मान्य केलाय. गोरक्षनाथांच्या जन्माविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. इतिहास संशोधक डॉ. मोहनसिंग यांच्या मते, ‘गोरक्षनाथ हे समाजातील कनिष्ठ स्तरात जन्म घेऊन क्रांती करणारे महापुरुष’ होते तर काही लोक त्यांना ‘ब्राह्मणकुलीन’ मानतात.

गोरखबानीत गोरक्षनाथांच्या रचना सापडतात. नाथपंथीयांमध्ये धर्मग्रंथाप्रमाणे गोरखबानीला महत्त्व आहे. तसंच, ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’ या ग्रंथालाही महत्त्व आहे. याच ग्रंथात नाथ संप्रदायाचा अष्टांग योग वर्णन करण्यात आलाय. यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्यहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे ते अष्टांग योग. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत ‘योगाब्जिनीसरोवर’ आणि ‘विषयविध्वंसैकवीर’ अशी दोन विशेषणं वापरून गोरक्षनाथांचा गौरव केलाय. रा. चिं. ढेरे म्हणतात, “ज्ञानेश्वरांच्या काळात साधनेला विशेष महत्त्व होतं आणि गोरक्षनाथ तर भारतीय साधनेच्या इतिहिसात युगकार म्हणूनच मानले गेले होते. “अशा या गोरक्षनाथांचे शिष्य म्हणजे गहिनीनाथ. आणि याच गहिनीनाथांनी महाराष्ट्रभूमीवर नाथ संप्रदाय आणण्याचं कार्य केल्याचं दिसून येतं. ते कसं, ते आपण जाणून घेऊया.

महाराष्ट्रात नाथ संप्रदाय कुणी आणला?

आधीही नमूद केल्याप्रमाणे, नाथ संप्रदायात गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व होतं. ‘नाथ संप्रदायाचा इतिहास आणि परंपरा’ या आपल्या पुस्तकात डॉ. वा. ल. मंजूळ म्हणतात, ‘नाथ संप्रदाय हा गुरुमार्ग आहे.’ ‘गुरुरत्र सन्मार्ग दर्शनशील:’ असं गोरक्ष सिद्धांतात म्हटलंय. शिवाय, गोरक्षनाथांचं चरित्र पूर्णत: गुरुभक्तीनं रंगलेलं आहे. गोरक्षनाथांनी ‘निगुरा न रहिबा’ म्हणजेच ‘गुरुविना राहू नकोस’ असा इशाराच गोरखबानीत दिलाय. हे लक्षात घेतल्यावर आपल्याला महाराष्ट्रातल्या नाथ संप्रदायाचं आगमन आणि त्यातून मग वारकरी संप्रदायाची क्रांती याचं महत्त्व अधोरेखित करता येईल. आदिनाथ – मच्छिंद्रनाथ – गोरक्षनाथ अशी गुरू-शिष्य परंपरा गहिनीनाथांपर्यंत आली. आणि याच गहिनीनाथांनी महाराष्ट्रात नाथ संप्रदाय आणला. महाराष्ट्रातील नाथ परंपरेचा मूळ पुरुष म्हणजे अनेक संशोधक गहिनीनाथांचा उल्लेख करतात.

निवृत्तीनाथ – महाराष्ट्रातला पहिले नाथ संप्रदायी

या गहिनीनाथांनीच महाराष्ट्राचे माऊली अर्थात संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथांना दीक्षा दिला. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना शिष्य बनवून घेतल्याचं सांगितलं जातं. दीक्षा देण्याचा हा काळ 1288 च्या सुमारासचा असावा असं रा. चिं. ढेरे सांगतात.

या उपदेशानंतर गहिनीनाथांच्या कर्तृत्वासंबंधीही फारसे काही उल्लेख आढळत नाहीत. परिणामी हा गहिनीनाथांचा शेवटचा काळ असावा, असंही मानलं जातं. तर संत निवृत्तीनाथ हे खरंतर संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. मात्र, भावाच्या नात्यापेक्षा गुरू म्हणूनच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत निवृत्तीनाथांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. वारकरी संप्रदायाचे आद्यसंत म्हणून ओळख असणारे संत नामदेव महाराजांपासून संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत नरहरी, गोरोबा, चोखोबा मेळा, परिसा, जगमित्रा, बंका इत्यादी सर्व संतमंडळ निवृत्तीनाथांना आद्यगुरुपदाचा मान देताना दिसतात.

“हे गुरुत्व त्यांना गहिनीनाथांच्या अनुग्रहामुळे मिळालेलं आहे. गहिनी हे नाथ संप्रदायातले एक महत्त्वाचे सिद्धपुरुष, त्यांनी प्रथमदर्शिनीच या निवृत्तीची आध्यात्मिक योग्यता जाणली आणि त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करून गुरुमंत्रही दिला. साहाजिकच निवृत्तीचा निवृत्तीनाथ झाला. यावेळी निवृत्ती महाराजांचे वय दहा-बारा वर्षांचं असेल,” असं सचिन परब संपादित ‘रिंगण’ विशेषांकातील लेखात नमूद करण्यात आलंय.

अधिक वाचा  तारक मेहता का उल्टा चष्माला आणखी एक धक्का, शैलेश लोढा यांचा मालिकेला रामराम?

याच विशेषांकात संतपरंपरांचे अभ्यासक देवदत्त परुळेकर संत निवृत्तीनाथ महाराजांबद्दल अधिक विस्तृतपणे लिहितात. ‘निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायी सिद्ध सत्पुरुष. नाथ संप्रदाय हा योग मार्गी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. असं असतानाही त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे स्वत: नाथ संप्रदायी सिद्धयोगी होते. अष्टांग योगात पारंगत होते. पण हा योग मार्ग सर्वसामान्य लोकांना साधणे अवघड आहे, याची जाणीव त्यांना होती. या अवघड योगमार्गाचं वर्णन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतही केलं आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी योगमार्ग सोडून भक्तिमार्गाचा पुरस्कार केला.’

‘जनसामान्यांचा कळवळा हेच खरे संतत्व. म्हणूनच निवृत्तीनाथांनी पंढरींच्या वारीच्या पताका ज्ञानोबांच्या खांद्यावर दिली,’ असंही देवदत्त परुळेकर म्हणतात. नाथ संप्रदायाचं ‘महाराष्ट्र कनेक्शन’ हे असं आहे. मात्र, इतकंच आहे, असंही नाही. सर्वांत मोठं कनेक्शन तर वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. कारण वारकरी संप्रदायाचं उगमस्थानच नाथ संप्रदायात आढळतं. मात्र, ‘महाराष्ट्राची माऊली’ संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला नाथ संप्रदायापासून स्वतंत्र अस्तित्व दिलं.

वारकरी संप्रदायाचं उगमस्थान नाथ संप्रदाय?

वारकऱ्यांची ‘माऊली’ अर्थात संत ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायी होते. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांच्या माध्यमातून ज्ञाननाथांना (संत ज्ञानेश्वर) दीक्षा दिली. त्यामुळेट ‘ज्ञानेश्वरी’ हा नाथ संप्रदायाचा वारसा मानला जातो. ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात ज्ञानेश्वरांनी याबाबतचा स्पष्ट उल्लेख केलाय. तरीही ज्ञानेश्वरीतील भक्तिप्राधान्यामुळे वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरीला प्रमाणग्रंथ म्हणून स्वाकरल्याचं रा. चिं. ढेरे सांगतात.

किंबहुना, रा. चिं. ढेरे म्हणतात, “ज्ञानेश्वरांच्या ग्रंथातील अद्वयानंदवैभव, अष्टांगयोग, दलितोद्धराची प्रेरणा आणि लोकभाषेची तरफदारी म्हणजे नाथपंथाचा वारसा होय.”

मग नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे वेगळे कसे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

‘रिंगण’ विशेषांकातील शर्मिष्ठा भोसलेंच्या लेखात त्यांनी ज्येष्ठ कीर्तनकार आणि अभ्यासक बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्यासोबतची बातचीत नमूद केलीय.

त्यात बद्रीनाथ महाराज तनपुरे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाबद्दल म्हणतात की, ‘मुळात हे दोन्ही संप्रदाय परस्परांवर आधारलेले आहेत. नाथ संप्रदायात ‘एक गुरू एक शिष्य’ अशी परंपरा होती. मात्र, ज्ञानदेवांनंतर ही परंपरा व्यापक झाली. त्यांनी अवघ्या वैष्णवांना या परंपरेत सामावून घेतलं. एकत्वाची पताका सगळ्यांच्या खांद्यावर दिली. इथंच विश्वबंधुत्वाची स्थापना झाली. अवघं विश्वच घर मानण्याची थोर भावना जन्म घेत होती.’

‘मुळात नाथ संप्रदाय बहुजनांचा संप्रदाय आहे. ज्यांना सनातन धर्मानं दूर लोटलं, त्यांचा हुंकार यात उमटलेला दिसतो. वारकरी-भागवत संप्रदायातही तेच तर झालं. संत नामदेवांनी जनाबाईंना सन्मान दिला. कीर्तनफडात तिच्या हाती वीणा दिली. याच बरोबर काव्य करण्याचाही अधिकार जनाबाई मिळवत्या झाल्या. तेव्हा तिच्या पाठी उभे राहिले. अशी ही मोठी क्रांतीच घडली.’

‘रिंगण’ या संतपरंपरेवरील विशेषांकाचे संपादक सचिन परब हे नाथ संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदायाचं असलेलं वेगळेपण मोजक्या शब्दात सांगतात. ते म्हणतात, ‘नाथ संप्रदायात गुरू-शिष्य परंपरा होती, गुरूनं शिष्य निवडून त्याला दीक्षा द्यायची अशी ती परंपरा. मात्र, संत ज्ञानेश्वरांनी या गूढतेचं लोकशाहीकरण केलं. गूढता मोडून काढत गुरूला बाजूला सारून जनसामान्यांच्या हाती परंपरा सोपवली. लोकांच्या भक्तिमार्गात गुरू असो किंवा इतर कुणी, यांचा अडसर बाजूला करणाऱ्या ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं जाणं किती यथोचित आहे हेही लक्षात येतं.’

तर नाथ संप्रदायाचं असं नातं महाराष्ट्राच्या माऊलींपर्यंत येऊन ठेपतं. मात्र, ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायाच्या परंपरांमधील काही गोष्ट घेऊन, काही गोष्टींना छेद देत वारकरी संप्रदायाची सुरुवात केली असली तरी महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी नाथ संप्रदायी मंडळी दिसून येतात किंवा त्यांच्या पाऊलखुणा दिसून येतात. त्यात वावगं नाही. कारण महाराष्ट्रभूमीला ‘संतांची भूमी’ म्हणून ओळख देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे मूळ याच नाथ सांप्रदयात आहेत. त्यामुळे या पाऊलखुणा असणारच.

महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाच्या पाऊलखुणा

सातारा आणि सांगलीच्या सीमेवर वाळवा तालुक्यात मच्छिंद्रगड आहे. या गडावर मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे. या गडावर मच्छिंद्रनाथांनी इसवीसन 1210 च्या सुमारास चैत्र वद्य पंचमीला समाधी घेतल्याची अख्यायिका आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दुर्गशृंखला बांधली, त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. तसंच, सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यात पंढरीच्या विठुरायाएवढेच गोरक्षनाथ मंदिराला महत्त्व आहे. एकादशीला सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील जगप्रसिद्ध नागपंचमीची सुरुवात गोरक्षनाथांनीच केल्याचं सांगितलं जातं.

अधिक वाचा  बृजभूषण सिंह यांना रोखा,राज ठाकरे ५ तारखेला अयोध्येत येणारच, कांचनगिरींचं पंतप्रधान मोदी यांना पत्र

गोरक्षनाथांचं काही दिवस इथं वास्तव्य होतं आणि निसर्गपूजक गोरक्षनाथांनीच इथं जिवंत नागाजी पूजा सुरू केल्याचं सांगितलं जातं. लेखक, पत्रकार युवराज पाटील यांनी माहिती मिळवली आहे. महाराष्ट्रात नाथ संप्रदाय आणणाऱ्या गहिनीनाथांची समाधी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या नाथ चिंचोली गावानजिक असल्याचं सांगितलं जातं. इथं गहिनीनाथगड आहे. गहिनीनाथांसह गोरक्षनाथांची समाधीही इथं आहे. इथं गहिनीनाथांच्या समाधीच्या मागं विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती उभ्या दिसतात. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये, कोकणापासून विदर्भापर्यंत, ठिकठिकाणी नाथ संप्रदायाच्या पाऊलखुणा दिसतात. ऊसाचा रस काढण्याच्या यंत्रावरील ‘कानिफनाथ महाराजांची कृपा’ लिहिलेलं तुम्ही वाचलंही असाल. ते काही वेगळं नाही. याच नाथ परंपरेशी नातं सांगणारं आहे.

मग तुकाराम महाराजांनी नाथ संप्रदायावर टीका का केली होती?

रा. चिं. ढेरे लिहितात की, “वामाचारी तंत्रसाधनांविरुद्ध गोरक्षनाथांनी आंदोलन उभं करून भारतीय साधनेचं शुद्धीकरण केले. मात्र काही वामाचारी साधक आपले पूर्वसंस्कार विसरले होते. “कानफाटे जोगी योनिपूजा आणि लिंगपूजा करतात आणि ‘वासनेचे दमन साधनेला बाधक ठरते’ असं समर्थनही करतात,” असं ढेरे म्हणतात. “हे सर्व पाहिल्यावर वाटतं की, गुरू गोरक्षनाथांच्या मूळ प्रेरणांना डावलून, तिरस्करणीय वाटणाऱ्या आचारांचा अवलंब करून त्यांचा पराभव केला गेला,” अशी खंत ढेरे व्यक्त करतात. ढेरेंनी त्यांच्या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा उल्लेख केलाय. उपेक्षणीय नाथजोग्यांची तुकाराम महाराजांनी संभावना केली होती असं ते म्हणतात.

संत तुकाराम महाराजांनी या वामाचारी नाथजोग्यांबाबत म्हटलं होतं की,

कान फाडुनिया मुद्रा ते घालिती, नाथ म्हणविता जगामाजीं,

घालोनिया फेरा मागती द्रव्यासी, परी शंकरासी नोळखती,

पोट भरावया शिकती उपाय, तुका म्हणे जाय नरलोकां’

रा. चिं. ढेरे पुढे म्हणतात की, “गोरक्षनाथांचा खरा वारसा इतिहासात जोग्यांपेक्षा चक्रधर, ज्ञानेश्वर, अल्लमप्रभू, कबीर, नानक दादू या महापुरुषांनी पत्करला आणि सांभाळला.”

आता गोरक्षनाथांच्या वारशाचाच उल्लेख आल्यानं, आपल्याला वर्तमानातही यावं लागेल आणि आता काय सुरू आहे, हेही पाहावं लागेल आणि त्यासाठी गोरक्षनाथांना मानणाऱ्यांचं केंद्र मानल्या जाणाऱ्या गोरखपुरातही जावं लागेल. गोरखपुरात गोरक्षपीठ आहे आणि उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पीठाधीश्वर आहेत. ते गोरक्षनाथांचे अनुयायी आहेत.

गोरखपूरमध्ये काय स्थिती आहे?

गोरक्षनाथांचं मंदिर गोरखपुरात आहे. नेपाळशी नातं सांगणाऱ्या गोरक्षनाथांचा ‘गोरखनाथ’ हे नाव नेपाळमधील गोरखा शब्दाशी संबंध सांगतो.

हा उल्लेख यासाठी की, मकरसंक्रातीला गोरखपुरात जेव्हा उत्सव साजर केला जातो, तेव्हा नेपाळच्या राजघराण्याकडून गोरखपुरात गोरक्षनाथांसाठी खिचडी पाठवली जाते. लखनऊ विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. कुमार हर्ष यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली. ते सांगतात की, “पूर्वी मकरसंक्रातील राजघराण्यातील व्यक्तीच खिचडी घेऊन गोरखपुरात यायची. आता त्यांचे प्रतिनिधी येतात.”

या गोरखपूरमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एकेकाळी खासदार होते आणि आता ते तिथूनच निवडणूक लढत आहेत. त्यांच्या सर्व मोठ्या कार्यांची सुरुवात गोरखपुरात गोरक्षनाथांच्या दर्शनानं होते, असं म्हटलं जातं.

गोरखपूर पीठाधीश्वर आणि राजकारण

गोरखपूरचे पीठाधीश्वर आणि राजकारण हे गणित गेल्या शतकात सुरू झालंय. त्यापूर्वी हे पीठ पूर्णपणे संप्रदायाचं काम करत असे.

1967 साली गोरक्षपीठाचे तत्कालीन प्रमुख महंत दिग्विजयनाथ हिंदू महासभेच्या तिकिटावर खासदार बनले होते. त्यानंतर त्यांचे वारसदार आणि रामजन्मभूमी आंदोलनातले नेते महंत अवैद्यनाथ हे 1962, 1967, 1974 आणि 1977 मध्ये उत्तर प्रदेशातील मानीराम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून, तर 1970, 1989, 1991 आणि 1996 मध्ये गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून येत असत. महंत अवैद्यनाथांचे वारसदार म्हणजे योगी आदित्यनाथ 1998 मध्ये गोरखपूरमधून 12 व्या लोकसभेत वयाच्या 26 व्या वर्षी खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 1998 पासून ते सलग जिंकत 2014 साली पाचव्यांदा लोकसभेत पोहोचले होते. 2017 मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. अशा पद्धतीनं गोरक्षनाथपीठाला आता राजकीय अंगही प्राप्त झालंय. चहूबाजूंनी मुस्लीम वस्ती असलेल्या गोरक्षपीठातले अनेक विधी आजही मुस्लिमांच्या उपस्थित होतात. गोरक्षनाथांच्या विचारांचा हा अंश अजून काही प्रमाणात अबाधित असल्याचं म्हणायला हवं, असं डॉ. कुमार अंश म्हणतात. मात्र, त्याचसोबत ते असंही म्हणतात की, नाथ संप्रदायाचे अनुयायी हे भगवान श्रीरामांना आराध्य दैवत मानतात. गोरक्षनाथांच्या विचारांपासून आताचे नाथ संप्रदायाचे अनुयायी वैचारिकदृष्ट्या किती अंतरावर आहे, याचा मोजमाप अनेकांना करता येत नाहीय. कारण आता या संप्रदयाला राजकारणाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होत असल्याची खंतही व्यक्त होताना दिसतेय.

(साभार :बीबीसी मराठी)