नागपूर : आयुष्यात आतापर्यंत मला अनेक मानसन्मान मिळाले, सत्कारही खूप झालेत. मात्र, नागपूरकर भगिनींनी आज माझा केलेला सत्कार लई भारी आणि मरेपर्यंत आठवणीत राहणारा आहे, अशा शब्दांत झुंड चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भविष्यात संधी मिळाल्यास पुन्हा नागपुरात शूटिंग करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

झुंड चित्रपटाच्या निमित्ताने समाजातील वास्तव व नागपूरकर कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल संयुक्त महिला सत्कार समितीच्या वतीने रविवारी दीक्षाभूमी येथील सभागृहात मंजुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नागराज म्हणाले, अनेक महिलांनी मिळून माझा सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नागपूरकर भगिनींनी हारतुरे देऊन केलेले कौतुक व पाठीवर ठेवलेला हात सदैव आठवणीत राहणार आहे. यावेळ मंजुळे यांनी झुंड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नागपुरात घडलेले किस्से व आठवणींना यावेळी उजाळा दिला. तसेच चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची स्तुती केली. नागपूरची ही मुले स्टार असून, भविष्यात मोठी होऊन शहराचे नाव कमावतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अधिक वाचा  “महिन्याभर पक्षात हुकुमशाही सुरू आहे”, सभेआधी वसंत मोरेंचा दावा!

व्यासपीठावर आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहरे, प्रा. सरोज आगलावे, तक्षशिला वागधरे, वंदना वनकर, प्रा. प्रज्ञा बागडे, सुषमा भड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात झुंड चित्रपटात काम करणाऱ्या शांता कुमरे, अंकुश गेडाम, विशाखा उईके, सौरभ शर्मा, चिराग, रिषभ बोदेले, कल्पना मेश्राम, कार्तिक उईके, निखिल गणवीर, विभा गजभिये, अंकित बनोदे, पुष्पा, रेहान, अॅलन, पॅट्रिक, मायकेल यांच्यासह तक्षशिला वागधरे, कमल वागधरे, तनिष्क वागधरे व वंदना जीवने यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कलावंतांच्या वतीने डॉन ऊर्फ अंकुशने मनोगत व्यक्त करताना चित्रपटात संधी दिल्याबद्दल नागराज यांचे आभार मानले. हिताश्री माटेने स्वागतनृत्य सादर केले. तक्षशिला वागधरे यांनी प्रास्ताविक केले. वंदना जीवने यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. संचालन डॉ. वीणा राऊत यांनी, तर संध्या राजूरकर यांनी आभार मानले.