पुणे : यंदाच्या मार्चमध्ये बंगालचा उपसागर अथवा अरबी समुद्रात चक्रवातनिर्मिती न झाल्याने रेकॉर्डब्रेक उन्हाळा अनुभवायला मिळाला. गेल्या 121 वर्षांत बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या दोन्ही सागरांत एकूण 44 चक्रवात तयार झाल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाच्या डायरीत नोंदवली गेली.

यंदा मार्च महिन्यात राज्यात अन् देशात फार कमी पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात ओलावा अन् वार्‍याचा वेगही कमीच होता. त्यामुळे गेल्या कमाल तापमानाचा शंभरपेक्षा जास्त वर्षांचा विक्रम मोडला गेला. दरवर्षी देशात मार्चमध्ये सरासरी 29.4 मि.मी इतका पाऊस पडतो, मात्र यंदा 8.3 मि.मी इतका पाऊस झाला. देशात 71 टक्के कमी पाऊस झाला, तर पूर्वोत्तर भागात 59.9 टक्के पाऊस पडतो, तो यंदा 24.4 टक्के, उत्तर-पश्चिम भारतात उणे 89 टक्के, मध्य भारतात उणे 86 टक्के, तर दक्षिण भारतात उणे 13 टक्के पाऊस पडला.

अधिक वाचा  निवडणुकीसाठी पुणे महापालिकेची तयारी सुरू; जागा शोधण्याचे आदेश

121 वर्षांत 44 चक्रवातनिर्मिती
पाऊस आणि हवेचा दाब बदलण्यास समुद्रात तयार होणारे चक्रवात कारणीभूत असतात. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार सन 1891 ते 2020 पर्यंत 44 चक्रवात बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात झाले. यापैकी 36 चक्रवात बंगालच्या उपसागरात, तर अरबी समुद्रात 8 चक्रवात तयार झाले. बंगालच्या उपसागरातील चक्रवाताचा वेग हा सरासरी 44 नॉट, तर अरबी समुद्रातील 8 चक्रवाताचा वेग 34 नॉट इतका होता. यातील 13 चक्रवात हे अतितीव्रतेचे होते.