नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देण्यासंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात याबाबतीतील एक ठराव मंजूर करण्यात आला होता. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना सक्षम पर्याय निर्माण करायचा असेल, तर शरद पवार हवेतच, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल शरद पवारांचीच गरज आहे. देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना नमूद केले. तत्पूर्वी, शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदात रस नसल्याचे स्पष्ट केले होते. यूपीएचे अध्यक्षपद स्वीकारण्यात मला रस नाही. मात्र, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून केले जाईल, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

अधिक वाचा  “महिन्याभर पक्षात हुकुमशाही सुरू आहे”, सभेआधी वसंत मोरेंचा दावा!

आम्ही सर्वच शरद पवारांचा आदर आणि सन्मान करतो

शरद पवार खूप मोठे नेते आहेत. आम्ही सर्वच त्यांचा आदर आणि सन्मान करतो. देशातील विरोधी पक्षांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत, यासाठी हालचाली सुरू आहेत आणि शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. शरद पवार यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभत असते. शरद पवार यांच्या प्रयत्नशिवाय मोदींना पर्याय आणि सक्षम विरोधी पक्ष तयार होऊ शकत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक मोठे नेते आणि ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी पुढे यावे, असे संजय राऊत म्हणाले.

अधिक वाचा  शिवलिंगावर अपमानास्पद टिप्पणी...; असदुद्दीन ओवैसींच्या प्रवक्त्याला अटक

दरम्यान, युपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाचा ठराव मंजूर केल्यानंतर भाजपने यावर टीका केली होती. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती. उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला, असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला होता.