वडगाव मावळ : कामशेत गावच्या हद्दीतील जुना मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास कारच्या भीषण अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन (वय ४४, रा. कळवा, ठाणे) व औतार गुरुदयाल सिंग सेहेरा (वय ५०,रा. कोपरी, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर नितेशकुमार देवेंद्रकुमार जैन हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास मुंबई कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या लाकूड वाहतूक करणार कंटेनर हा कामशेत खिंड उतरत असताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने पुणे लेनवर पलटी झाला. व कंटेनर मधील सर्व लाकडे मुंबई लेनवर पडली होती. त्यावेळी पुणे कडून मुंबईकडे निधालेली मारुती कार ही महामार्गावर पडलेल्या लाकडांना वेगात येऊन आदळल्याने कार मधील पुढे बसलेले राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन व औतार गुरुदयाल सिंग सेहेरा यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर मागच्या सीटवर बसलेले नितेशकुमार देवेंद्र कुमार जैन हे या अपघात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा  जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता~मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार समीर शेख व पोलीस नाईक अनिल हिप्परकर, सुनिल गवारी, सचिन निंबाळकर, केकेआर रुग्णवाहिकेचे चालक कैसर शेख, स्वप्नील मोकाशी यांनी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना तात्काळ बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. या आपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने व लाकडे बाजूला करून वाहरुक सुरळीत करण्यात आली आहे.