पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण हे टाईमपास राजकारण आहे. त्यामुळे अगोदर मी मनसेला टाईमपास टोळी म्हणायचो. सध्या मनसे भाजपची ‘सी टीम’ बनली आहे. कारण, एमआयएम ही भाजपची ‘बी टीम’ आहे. मनसे सी टीम बनल्याचा आपल्याला आनंद आहे, असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मनसेला नाव न घेता लगावला.

सकाळ माध्यम समुहाच्या वतीने लिडिंग आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराचे वितरण रविवारी (ता. ३ एप्रिल) पुण्यात झाले. त्या कार्यक्रमात ‘साम टीव्ही’चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये भाजप आणि मनसे हे दोघे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी राजकारणाची महाराष्ट्रातील जागा व्यापण्याचा प्रयत्न करत आहेत का?तसेच, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून घेतलेली भूमिका याबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी मनसेवर हल्लाबोल केला.

अधिक वाचा  ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं..

जनतेला दिलेली वचने पूर्ण करणे आणि त्यांची सेवा करणे हेच आमचे हिंदुत्व आहे. भाजप मात्र आपल्या सत्तेसाठी इतर पक्षांना वापरून घेतो. प्रक्षोभक बोलून, हिंदू-मुस्लीम दंगे करून तसेच वाद घडवून भारतीय जनता पक्ष सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काल झालल्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषण हा त्यातीलच एक प्रकार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.