पुणे –राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यात येतील. विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकत विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये.या बहिष्काराचा निकालावर परिणाम होणार नाही, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने या शिक्षकांनी दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी दहावी व बारावीच्या निकालास विलंब होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. बारावीची लेखी परीक्षा झाल्यानंतर दहावीची लेखी परीक्षाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे निकाल लावण्याच्या दृष्टीने उत्तरपत्रिका तपासणीचे कामास सुरूवात झाली आहे. दरम्यान, अनुदानित शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेण्यात येत आहे. त्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांच्या बहिष्काराचा निकालावर परिणाम होणार नाही.

अधिक वाचा  रिहे येथे ग्रामस्थांना सनदांचे वाटप

विनाअनुदानित शाळांना शंभर टक्‍के अनुदान द्यावे, या शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी या शिक्षकांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. परंतु अद्याप दखल घेतली जात नसल्याने उत्तरपत्रिकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.