पुणे –ससून रुग्णालयात कर्मचारी आणि काही अधिकारीदेखील दारू पिऊन कामावर येतात. अशा कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून न घेता त्यांच्यावर त्या-त्या विभागप्रमुखांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करा, असे लेखी आदेश रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी काढले आहेत.

धक्‍कादायक बाब म्हणजे केवळ तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारीच नव्हे तर काही अधिकारीदेखील रुग्णालयात दारू पिऊन येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे हे आदेश काढण्यात आले आहेत. काही कर्मचारी मद्यप्राशन करून कामावर येतात. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागप्रमुखांनी कामावर रूजू करून घेऊ नये. तसेच वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक कर्मचारी वेळे आधीच घरी निघून जातात. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असेही या आदेशपत्रात नमूद केले आहे.

अधिक वाचा  “घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला”; सभेनंतर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया

गाडीत बसून पिणाऱ्या ‘त्या’ ‘विजयी वीर’ अधिकाऱ्याची चर्चा
ससून रुग्णालयातील एक अधिकारी तर रुग्णालयाच्या आवारातच सायंकाळच्या वेळी चारचाकीमध्ये बसूनच दारू पित असल्याची जोरदार चर्चा सध्या ससूनमध्ये होत आहे. ‘कसे काम करावे’ याविषयीचे धडे हा प्रशासकीय अधिकारी सुरक्षारक्षक आणि डॉक्‍टरांनाच देत असतो. मध्यंतरी तर कुत्र्यांना हाकलवून लावा असे फर्मान त्यांनी सुरक्षारक्षकांना दिले होते. एवढेच नव्हे तर अधिकाराचा गैरवापर करून, सुरक्षारक्षक आणि डॉक्‍टरांना ‘तुम्ही राजीनामा द्या’ अशी भाषाही त्यांच्याकडून वापरली जात आहे.