पुणे : फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी विक्रेत्या तरुणाला मारहाण करुन पाया पडायला लावले तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

या संबंधी चार व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात या गुंडांनी एका तरुणाला त्याच्या आईसमोर कपडे फाटेपर्यंत मारहाण करुन पाया पडायला लावले आहे. बालाजीनगरमधील गुलमोहर अपार्टमेंटसमोर हा प्रकार घडलेला दिसून येत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवर रायडिंग करत आलेल्या गुंडांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केले जात असल्याचे दिसून येत आहे. अन्य एका व्हिडिओत बालाजीनगरमधील गुंडाची टोळी हातात कोयते घेऊन जाताना दहशत माजवतो आहे.

अधिक वाचा  पुण्यातही ज्ञानवापी? शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात

याबाबत परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलिस स्टेशनकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे पहायला मिळत आहे. अशा घटनांमुळे मुलांमध्ये भीती उरली नसून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना छेडणे, हत्यार दाखवणे धमकी देणे हे राजरोस सुरू आहे.
त्यामुळे या गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित केला जातोय. सहकारनगर पोलीस स्टेशन व धनकवडी पोलीस चौकीतून नागरिकांना सांगितले जाते की तुम्ही तिथे राहू नका? त्यामुळे पोलिसांवर देखील आता या गुंडांची दहशत बसली आहे का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

अधिक वाचा  पत्नीला ‘मसणात जा’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या टीकेला सदानंद सुळेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, स्त्रीद्वेषी..

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस सर्तक झाले असून त्यांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज व या व्हिडिओची तपासणी करुन या गुंडांचा शोध सुरु केला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले की, यातील एका व्हिडिओत ५ गुंड दिसत असून दुसऱ्या व्हिडिओमध्ये ६ गुंड दिसत आहे. त्यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यातील मारहाण झालेल्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असून त्याच्याकडून फिर्याद घेण्याचे काम सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे शहरात नेमके कोणाचे राज्य आहे, पोलिसांची भिती आता गुंडांना राहिली नसल्यानेच असे प्रकार वाढले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.