नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीची चाहूल लागली आहे. भाजपने आपले डाव सुरू केले आहेत. संजय राऊत नुकतेच विदर्भात येऊन गेलेत. त्यांनी शिवसेनेत प्राण फुंकले. संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे भेटलेत. त्यामुळं शिवसेना-राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फायदा होईल. काँग्रेसचं मात्र नुकसान होऊ शकते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन नगरसेवक, तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आले होते. यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्र लढण्यास दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. यात नुकसान मात्र काँग्रेसचं होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  “महिन्याभर पक्षात हुकुमशाही सुरू आहे”, सभेआधी वसंत मोरेंचा दावा!

भाजपचा मतविभाजणीवर भर

एमआयएम आणि आप हे दोन पक्ष मनपा निवडणुकीत उडी घेऊ शकतात. संयुक्त रिपब्लिकन आघाडीही निवडणूक रिंगणात उतरली आहे. बसपाचा हत्ती चाल चालत आहे. अशावेळी भाजप आणि काँग्रेसला योग्य पाऊलं उचलावी लागतील. भाजपची सत्ता गेल्या पंधरा वर्षांपासून असल्यानं ते रणनीती आखत आहेत. मतविभाजन करून निवडणूक कशी जिंकता येईल, यावर भाजपचा भर राहणार आहे. एमआयएम आणि रिपाइंचा मतविभाजणीचा फायदा कसा घेता येईल, याकडं भाजपची नजर आहे.

काँग्रेसचा लागणार कस

कॉंग्रेस स्वबळाचा नारा देत असेल, तर याचा त्यांना फटका बसू शकतो. एमआयएम आणि आप यांच्या हालचालींवर भाजप लक्ष ठेऊन आहे. महाआघाडी एकत्र आल्यास भाजपला भारी पडणार आहे. पण, विद्यमान परिस्थिती पाहता हे तिन्ही पक्ष नागपूर मनपा निवडणुकीत एकत्र येतील, असं वाटत नाही. काँग्रेसचं नव्हे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करतील. त्यांचं एकमत होणार नाही. याचा फायदा भाजपला होईल.

अधिक वाचा  बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास गरजेचा - चंद्रकांत पाटील

बसपावर चिंतनाची वेळ

गेल्या निवडणुकीत बसपा हा भाजप, काँग्रेस पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष नागपुरात होता. पण, उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बसपाचे पानीपत झाले. त्यामुळं बसपाला चिंतन करण्याची वेळ आली आहे. बसपा कोणत्या उमेदवारांना तिकीट देते. कुणाला निवडणूक लढण्याची संधी मिळते, यावरही बरच काही अवलंबून आहे.