रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचलं आहे. अद्याप रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हवर पूर्णपणे ताबा मिळवता आलेला नाही. यातच ब्रिटिश एजन्सीच्या हवाल्यानं देण्यात आलेल्या माहितीनुसार रशियाकडे आता केवळ पुढील १४ दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जितके दिवस युद्ध ताणलं जाईल तितकं रशियन सैन्याला कीव्हवर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे अणुहल्ल्याचे हे संकेत तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

इतके दिवस युद्ध सुरू असून अजूनही कीव्हवर कब्जा करण्यात यश येत नसल्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन संतापल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर संतापलेल्या पुतीन यांच्याकडून अणुहल्ल्याचा निर्णय तर घेतला जाणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेन विरुद्धच्या युद्धाला आता इतके दिवस झाले आहेत की पुतीन यांनीही हे युद्ध इतके दिवस ताणलं जाऊ शकेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. युक्रेनी सैन्य रशियाला निकराचा लढा देत आहेत. आता हे युद्ध जितके जास्त दिवस सुरू राहिल तितकं तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आणखी गडद होत जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुतीन यांच्या निर्णयाचा काहीच अंदाज बांधला जाऊ शकत नाही. त्यामुळे अणुहल्ल्याची शक्यता बळावली आहे.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?

संयुक्त राष्ट्रांनी दिलेला इशारा चिंताजनक

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र सज्ज विभागालाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच हे युद्ध कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्धात रुपांतरीत होऊ शकतं, असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी म्हटलं आहे. यासोबतच युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनीही या युद्धात नाटो सामील झाल्यास अण्वस्त्र महायुद्ध होण्याची भीती व्यक्त केली आहे. याआधीच रशियाने जगभरातील देशांना धमकीच दिली आहे. युक्रेनच्या बाबतीत अमेरिका किंवा नाटो देश आल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.