रशियानं युक्रेनवर हल्ला करून आठ दिवस पूर्ण झाले आहेत. अनेक युक्रेनियन सैनिक रशियन सैनिकांना थोपवण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. रशियाच्या आक्रमकतेपुढे आणि घातक शस्त्रास्त्रांपुढे आपला निभाव लागणे कठीण आहे, हे माहित असूनही हे सैनिक लढत आहेत.
युद्धावर गेल्यावर आपण परत येणं कठीण आहे, हे युक्रेनियन सैनिकही जाणून आहेत. त्यामुळे हे सैनिक आपली शेवटची भेट म्हणून आपल्या कुटूंबाला भेटत आहेत. एका युक्रेनियन सैनिकाच्या लहान मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो ट्विटरवर शेअर होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही या युद्धामुळे युक्रेनियन नागरिक आणि सैनिक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, याची कल्पना येईल.
या फोटोमध्ये एका युक्रेनच्या सैनिकाचे व्यवस्थित घडी घातलेले कपडे, शुज, टोपी तसेच इतर साहित्य दिसत आहे आणि या कपड्यांवर एक-दीड वर्षाचा लहान चिमुकला शांत झोपलेला दिसत आहे. या शांत झोपलेल्या चिमुकल्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या वडिलांच्या कपड्यांमध्ये त्याला किती सुरक्षित वाटतंय याची कल्पना येते. परंतु या चिमुकल्याला माहिती नाही की हे कपडे घालून युद्धामध्ये लढायला गेलेला पिता कदाचित पुन्हा त्याला कधीच पाहता येणार नाही…या चिमुकल्याचा फोटो जितका मनाला भिडतो तितकेच त्यावरचं कॅप्शनही भावनिक आहे. त्यामध्ये लिहिलंय, “गुड बाय, माझ्या बाळा…जर वाचलो तर पुन्हा भेटू…”
कोणत्याही संवेदनशील माणसाच्या हृदयाचा ठाव घेणारा हा फोटो kovak sorava या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला जात आहे. काळजाचा ठाव घेणाऱ्या या ट्विटला 48.5 हजार लोकांनी लाईक केलं आहे तर 4500 लोकांनी शेअर केलं आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सारं जग चिंतेत आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक लोक बेघर झाले आहेत. परदेशातून विविध कारणांसाठी युक्रेनमध्ये आलेले नागरिकही जीव मुठीत धरून मदतीची प्रतिक्षा करत आहेत. या युद्धादरम्यान हृदय हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. यादरम्यान एका युक्रेनियन सैनिकाच्या लहानशा मुलाचा हा फोटो लोकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे.