रायगड : भाजप हिजाब घालण्यावरून जे राजकारण करीत आहे हे हिणकस आहे. विद्यार्थ्यांमध्ये हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याचे नियोजनबद्ध काम भाजप करीत असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात जराही हस्तक्षेप केलेला नाही. याला माझा आक्षेप असल्याचे ते म्हणाले. हिजाब प्रकरणावरून कर्नाटक सरकारने राजकारण करून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद केल्या ही नामुष्कीची गोष्ट असल्याचे मुणगेकर यांनी म्हटले आहे. अलिबाग मधील सहयोग पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर याचे विद्यमान भारतीय अर्थव्यवस्था याविषयावर मेघा चित्रमंदिर येथे व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यानानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी हिजाब प्रकरणावरून बोलताना त्यांनी भाजपवर निशाण साधला. हिजाब घालणार नाही, वापरणार नाही असे विद्यार्थी बोलत असतील तर मी त्याचे स्वागत करतो. मात्र, यावरून भाजपने राजकारण सुरू केले आहे. धार्मिक आणि जातीय राजकारण करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला आहे.