5 G प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलासाठी दिलासादायक बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायलयाच्या खंडपीठाने एका प्रकरणी नुकतीच सुनावणी केली आहे. अभिनेत्री जुही चावलावर 20 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला होता. तो न्यायालयाने कमी करून 2 लाख रुपयांवर आणला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठाने जुही चावला आणि इतर दोघांनी दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. एका आदेशाविरोधात याचिकेत आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी 27 जानेवारी रोजी सुनावणी झाली. कोर्टाने दंडाची रक्कम कमी केली, मात्र सेलिब्रेटी या नात्याने जुही चावलाने काही सामाजिक कार्य करावे, अशी अटही घालण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणेकरांनो सावधान: वायफाय आणि केबलचे काम असल्याचे सांगून एण्ट्री करायचा तरूण आणि...

देशात 5G तंत्रज्ञानाचा वापर करण्याविरोधात अभिनेत्री जुही चावलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संपूर्ण मानवजाती तसेच निसर्गावर याच्या किरणोत्सर्गाचा परिणाम होईल, हे धोकादायक आहे, असे तिने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावलाची 5जी लाँच करण्याविरोधातील याचिका फेटाळली होती. तसेच तिला 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. न्यायालयाने म्हटले होते की तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी होत आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी 5 जी तंत्रज्ञान वापरासंदर्भातील जुही चावला विरोधातील दिल्ली राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या याचिकेवर सुनावणी केली. या प्रकरणी जुहीसह इतर दोघांना जो 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता, तो 2 लाख रुपयांपर्यंत घटवण्यात आला आहे. एवढेच नाही एक सेलिब्रेटीच्या भूमिकेतून तिने समाजाच्या कल्याणासाठी काही काम करावे, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. जुही चावलाच्या बाजूने वकील सलमान खुर्शीद यांनी युक्तीवाद केला. हा दंड माफ केला तर खटला परत घेऊ, असे खुर्शीद यांनी न्यायालयात म्हटले होते. त्यानंतर खंडपीठाने समितीला दंडाची रक्कम कमी करता येईल का, असे विचारले. अखेर ही रक्कम कमी करण्यास सांगितली. मात्र जुही चावलाने समाजासाठी काही कार्य करण्याची अटही त्यात घालण्यात आली आहे.