काकस्पर्श  आणि नटसम्राट यांसारख्या दर्जेदार कलाकृतींनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित चित्रपट ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी प्रेक्षकांचा टीझरलाही भरभरून प्रतिसाद लाभला होता. चित्रपटातील गाण्यांचेही संगीतप्रेमींकडून भरभरून कौतुक होत असतानाच आता ‘पांघरूण’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे आता ‘पांघरूण’ विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. मुळात महेश मांजरेकर हे नेहमीच असामान्य विषय हाताळतात. त्यातही काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यापैकीच अनेक वर्षांनी घडणारा ‘पांघरूण’ हा चित्रपट. हा एक चित्रपट नसून ही एक कलाकृती आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

अधिक वाचा  नागपूरमध्ये शिवसेनेला भीती राजकीय ‘गेम’ होण्याची

ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडते. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते. वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. तिच्या आयुष्याचा संसारिक प्रवास कसा होतो हे हळूहळू उलगडत जाणारी ‘एक विलक्षण प्रेम कहाणी’ आपल्याला ‘पांघरूण’ मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

 महेश मांजरेकर व झी स्टुडिओज ‘पांघरूण’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा अनोखा कलाविष्कार रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज झाले आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचे संगीत लाभले आहे तर वैभव जोशी यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेख तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पांघरूण’च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर रसिक प्रेक्षकांना सुरेल, अविस्मरणीय संगीत व भावनिक दर्जेदार असे कथानक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

‘पांघरूण’ चित्रपटाबद्दल झी स्टुडिओजचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी सांगतात, ” या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनोखी प्रेमकहाणी अनुभवायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांनी उत्तम कथानकासोबतच सांगितिक खजिना प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. महेश मांजरेकर हे एक असे दिग्दर्शक आहेत, जे नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. उत्कृष्ट विषय हाताळण्यात महेश मांजरेकर अव्वल आहेत. याशिवाय सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. चित्रपटातील गाणीही  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे ‘पांघरूण’च्या प्रदर्शनाबाबत प्रेक्षकांसोबत आम्हीही खूप उत्सुक आहोत.”