पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी शुक्रवारी बंडाचे निशाण फडकावले. सत्तारूढ भाजपला रामराम ठोकत त्यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय जाहीर केला. ती घडामोड भाजपच्या दृष्टीने राजकीय हादरा मानली जात आहे.

गोव्यात भाजपचा प्रभाव निर्माण करण्यात मोठा वाटा असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत प्रदीर्घ काळ पणजीचे प्रतिनिधित्व केले. त्या जागेवरून निवडणूक लढवण्यास उत्पल आग्रही होते. मात्र, भाजपने त्यांना तिकीट नाकारले. त्या पक्षाने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांनाच पसंती दिली. त्यामुळे दुखावलेल्या उत्पल यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल

त्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपने मला इतर मतदारसंघांमधून लढण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे माझ्यापुढे कुठला पर्याय उरला नाही. माझ्यासाठी निर्णय घेणे अवघड होते. मात्र, गोव्यातील जनतेसाठी तो मी घेतला. माझ्या राजकीय भवितव्याची चिंता कुणीच करू नये.

गोव्याची जनता ते ठरवेल. माझा राजीनामा ही केवळ औपचारिकता आहे. भाजप नेहमीच माझ्या हृदयात राहील. इतर कुठल्याही पक्षात मी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रसंगी भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याचा पर्याय उत्पल यांनी खुला ठेवल्याचे मानले जात आहे.