आळंदी (देहू) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म भुमी असलेली देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने देहू नगरपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली. १७ पैकी १४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले असून दोन अपक्ष निवडून आले आहेत,शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही.

राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके व भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहू गावात प्रचाराचा धुराळा उडविल्याने निवडणूक अंत्यत चुरशीची झाली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मोठी आघाडी घेत विजयांचे संकेत दिले होते. आजच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविलेल्या या एकतर्फी विजयाचा मावळ तालुक्यात सर्वत्र जल्लोष सुरु झाला आहे.

अधिक वाचा  भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

देहू नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांमध्ये एक उत्सुकता होती. एकूण 17 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात होते. त्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला आहे. तर दुसरीकडे अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे आता देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालची आणि भंडाऱ्याची उधळण करत एकच जल्लोष केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

राष्ट्रवादी कॉंग्रेस –

वार्ड क्र. 1 – मीना राहूल कुऱ्हाडे,

वार्ड क्र. 2 – रसिका स्वप्नील काळोखे,

अधिक वाचा  २२१ जोडप्यांचे तडजोडीने फुलले संसार; स्वखुशीने १०४ विभक्त कुटुंब

वार्ड क्र. 3 – पूजा अमोल दिवटे,

वार्ड क्र. 4 मयूर दत्तात्रय शिवशरण,

वार्ड क्र. 6 – पूनम विशाल काळोखे,

वार्ड क्र. 9 – स्मिता शैलेश चव्हाण,

वार्ड क्र. 10 – सुधीर सुरेश काळोखे,

वार्ड क्र. 11 पौर्णिमा विशाल परदेशी,

वार्ड क्र. 12 – सपना जयेश मोरे,

वार्ड क्र. 13- प्रियांका अभिजित मोरे,

वार्ड क्र. 14 प्रवीण रामदास काळोखे,

वार्ड क्र. 15 आदित्य चिंतामण टिळेकर,

वार्ड क्र. 16 – योगेश बाळासाहेब परंडवाल,

वार्ड क्र. 17 ज्योती रोहिदास टिळेकर

असे 14 उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार वार्ड क्रमांक 5 मधून शितल अनिल हगवणे, वार्ड क्र. 7 – योगेश हनुमंत काळोखे आणि वार्ड क्र. 8 मध्ये भाजपाचे पूजा सुमित काळोखे हे उमेदवार विजयी झाले आहेत.